Kapil Sharma’s TV show: लोकप्रिय अभिनेता कपिल शर्मा सध्या नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावताना दिसतात.
अभिनेता नेमकं काय म्हणाला?
ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या या कार्यक्रमाआधी कपिल शर्मा हा ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात दिसला आहे. तसेच ‘किस किस को प्यार दूँ?’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता कपिल शर्मा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘कपिल शो’ या कार्यक्रमाच्या काही एपिसोडमध्ये काम केलेल्या विकल्प मेहता या कलाकाराने कपिलच्या शोबद्दल काही वक्तव्ये केली आहेत. ही वक्तव्ये लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विकल्प मेहताने नुकतीच वायटी महेंद्रा पॉडकास्ट या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सांगितले की, लाइव्ह शो ही संकल्पना घेऊन शो केला जातो. त्यावेळी फार ब्रेक घेतले जात नाहीत. नाटक ज्या पद्धतीने सादर केले जाते, त्याचप्रकारे त्या भागांचे शूटिंग होते. पहिल्या सेगमेंटमध्ये कपिलचे एकट्याचे काही डायलॉग किंवा अर्चना पूरन सिंह यांच्याबरोबरचे काही संवाद असतील त्याचे शूटिंग होते. त्यानंतर पाहुण्यांना बोलावले जाते, त्यांच्याशी गप्पा मारल्या जातात. या दोन सेगमेंटमध्ये छोटे ब्रेक असतात.
विकल्प असेही म्हणाला, “या ब्रेकमध्ये प्रेक्षक तिथेच असतात. जर तो ब्रेक १५ मिनिटांचा असेल तर त्यांनादेखील ब्रेक घ्यायला सांगितले जाते. जर जेवणाची सुट्टी असेल तर ती एक तासाची सुट्टी असते.”
या मुलाखतीत त्याला विचारले की, त्या शोमध्ये येण्यासाठी प्रेक्षकांना पैसे देऊन तिकीट घ्यावे लागते का? यावर तो म्हणाला, “जितके मला माहीत आहे की टेलिव्हिजन शोसाठी तिकीट विकत घ्यावे लागत नाही. याबद्दल मला १०० टक्के खात्री नाही, पण मला इतके माहीत आहे की शोमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत.”
अभिनेत्याने असाही खुलासा केला की, प्रेक्षकांपैकी काहींना निर्माते पैसे देतात. तो म्हणाला, “काही ज्युनिअर कलाकार प्रेक्षकांमध्ये बसलेले असतात. शूटिंग सकाळी १० वाजता सुरू होते आणि ते रात्री ८ किंवा कदाचित रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असते, त्यामुळे निर्मात्यांना प्रेक्षकांमध्ये असे चेहरे हवे असतात, जे शूटिंगदरम्यानचा संपूर्ण वेळ एकाच जागी बसून तितक्याच उत्साहाने टाळ्या वाजवू शकतील. त्यांना असे प्रेक्षक हवे असतात, जे त्यांच्या सूचनेनुसार वागतील. ते त्या प्रेक्षकांना पैसे देतात. त्यांना जेवण वगैरे दिले जाते. बहुतेक टीव्ही शोमध्येही असेच आहे.
विकल्प असेही म्हणाला की, प्रेक्षकांमध्ये काही ज्युनिअर कलाकार असतात. त्याबरोबरच शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे पाहुणेदेखील असतात. २० टक्के प्रेक्षक हे पाहुणे असतात. जसे की मी शोमध्ये काम करत असेल तर मी त्या शोमध्ये माझ्या पाहुण्यांना बोलावू शकतो. पण, टीव्ही शोमध्ये प्रेक्षक म्हणून जाण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. ५००-१००० रुपयांचे तिकीट काढण्याची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. ती फसवणूक आहे.”
दरम्यान, कपिल शर्मा त्याच्या शोबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतो.