मालिकांत काम करणारी कलाकार मंडळी ही रात्रंदिवस प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मेहनत घेत असतात. वरकर्णी त्यांचं काम नेहमीचं आणि सोपं वाटत असलं; तरी त्यामागे कलाकारांची तितकीच मेहनत आणि कष्ट असतात. शूटिंगच्या अनियमित वेळा, कामाचे अनेक तास, त्यामुळे वेळेवर जेवण न खाणं… या आणि अशा अनेक कारणांमुळे कलाकारांच्या प्रकृतीवर परिणाम होताना दिसतो.

आजवर अनेक कलाकारांनी मालिकांत काम करतानाच्या त्यांच्या शारीरिक त्रासाबद्दल आणि संघर्षाबद्दल सांगितलं आहे. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वलोकर. कौमुदी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते.

अशातच तिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील गेल्यावर्षीचा मंगळागौर खेळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह तिने पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ती असं म्हणते, “व्हिडीओ जुना असला तरी तो दिवस अजून डोळ्यासमोर आहे. मंगळागौरचं शूट, मागचं वर्ष… एकीकडे भारी-भारी सीन आणि खेळ सुरु… तर दुसरीकडे पाऊस, दमट हवा, आणि शरीर अक्षरशः ‘बस्स झालंय’ असं ओरडत होतं.”

यापुढे ती पोस्टमध्ये म्हणते, “संपूर्ण सेटवर कुणाला ताप, कुणाला पाठदुखी, कुणाचे गुडघे दुखत होते आणि मला व्हायरल ताप आला होता. ६.३० चा कॉलटाइम… इलेक्ट्रल, ओआरएस, तापाच्या गोळ्या… असं वाटलं जणू मेकअप किटपेक्षा मेडिकल किट जास्त मोठं आहे. पण काय करणार? कॅमेऱ्यासमोर चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात ताकद हवीच. कसेबसे धावपळीचे ते सीन रात्री १० वाजता संपवले आणि मग ठाण्याहून पुण्यापर्यंत, मुसळधार पावसात गाडी चालवत पोहोचले. (हो, ड्रायव्हिंग पण स्वतःच केलं. अधिकचा स्टंट सीन)”

यापुढे कौमुदी पोस्टमध्ये म्हणते, “खरंच, तो दिवस अभिनयापेक्षा जास्त सहनशक्ती पाहणारा होता. पण अशा दिवसांमुळेच आठवणींना वजन येतं”. दरम्यान, कौमुदीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील सगळ्या अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळतानाचे पाहायला मिळत आहे.