किरण माने हे लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलंय. ते काही चित्रपटांचं शूटिंगही करत आहेत. किरण यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत राजकीय इनिंग सुरू केली. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे, ज्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकारांना विमानात भेटल्याचा उल्लेख केला आहे.

किरण माने यांनी नागपूरला विमानाने जातानाचा अनुभव सांगितला. “काल नागपूरला जाताना भल्या पहाटेचं फ्लाईट होतं. नेहमीप्रमाणं वेळेवर जाग आलीच नाही. लेट पोहोचलो. बोर्डींग टाईम निघून गेला होता. धावतपळत धापा टाकत विमानात शिरलो. तर विमानातनं वेगवेगळ्या सीटवरनं “ओS मानेS याSSS” अशा हाका ऐकायला यायला लागल्या…
दचकून बघितलं तर विमानात ही महाराष्ट्रभर हास्याचा मळा फुलवणारी ही ‘जत्रा’ बसली होती! त्यातले बरेच जुने सहकलाकार, मित्र. ओंक्या राऊतबरोबर सहासात वर्षांपूर्वी मी एक नाटक केलं होतं… त्यानंतर थेट आत्ताच भेटला. “सर, तुम्ही त्यावेळी जसे होता, तस्सेच अजूनही आहात.” म्हणत मिठी मारली त्यानं. अरूण कदम दहाबारा वर्षांपूर्वी एका सिरीयलमध्ये माझा मोठा भाऊ झाला होता… तो बी भेटला. प्रभाकर मोरे तर लै लै लै जुना खास मित्र. प्रभ्याला आणि मला किती बोलू किती नको असं झालं होतं. नागपूरला एअरपोर्टमधून बाहेर पडेपर्यंत आमच्या गप्पा संपत नव्हत्या. प्रसाद खांडेकर पुर्वीपास्नं ‘नाटकवाला’ दोस्त. शिवाली परब हास्यजत्रापासून माहिती झालेली गुणी पोरगी. श्याम राजपूत पहिल्यांदाच भेटला.
शिवजयंतीची पहाट अशी चेहर्‍यावर हसू फुलवत आली आणि ‘दिल बाग बाग’ करून गेली!” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण माने यांनी या पोस्टबरोबर एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्याबरोबर प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, शिवाली परब, ओंकार राऊत दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.