Actress Who Married at 16 and Divorced at 18: मनोरंजन क्षेत्रात प्रत्येक माध्यमाच्या विविध अडचणी असतात. दीर्घ कालावधीपासून टीव्ही इंडस्ट्रीबद्दल असे ऐकायला मिळते की, तेथील कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, अनेक तास काम करावे लागते, अशा या क्षेत्रातील कलाकारांच्या समस्या वा अडचणी वेळोवेळी समोर येत आहेत. अनेक कलाकार त्याबद्दल उघडपणे बोलले आहेत.
काही कलाकारांना कामाच्या ठिकाणी जितका संघर्ष करावा लागतो, तितकाच संघर्ष त्यांच्या खासगी आयुष्यातदेखील सुरू असतो. उर्वशी ढोलकिया ही त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. तिने सहा वर्षांची असल्यापासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.
१६ व्या वर्षी ती प्रेमात पडली, त्यानंतर तिने लग्न केले आणि लग्नानंतर तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. उर्वशीने यापूर्वी अनेक वेळा तिच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले आहे. तिने खुलासा केला आहे की, १८ वर्षांच्या वयात ती दोन मुलांची आई होती. त्यावेळी तिचा घटस्फोट झाला होता.
“मी प्रेमात…”
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला कायमच परीकथेसारखे आयुष्य हवे होते. ज्या व्यक्तीशी मी लग्न केले होते, त्याच्या जेव्हा मी प्रेमात पडले, त्यावेळी मी राजकुमारी असल्यासारखे मला वाटले. आम्ही एक वर्षभर डेट केले. मी प्रेमात वेडी झाले होते. त्या काळात एक मुलगी म्हणून लग्नाची संकल्पना तुमच्या मनात रुजवली जात असे. माझी आई मला म्हणाली की, तू स्वत: पैसे कमव, स्वावलंबी हो; पण लग्न कर.”
“त्यावेळी मी १६ वर्षांची होते. मला तितकी समज आली नव्हती. मला त्यावेळी वाटले की, आता मला काम करायचे नाही. आता मला परीकथेतील परीसारखे आयुष्य जगायचे आहे. पण, माझे समज लवकरच दूर झाले. मी १६ व्या वर्षी लग्न केले, १७ व्या वर्षी मला जुळी मुले झाली होती आणि १८ व्या वर्षी माझा घटस्फोट झाला होता.
घटस्फोटाचे कारण सांगताना अभिनेत्री म्हणाली, “त्याला जबाबदाऱ्या नको होत्या. पण, मी माझ्या मुलांना सोडू शकत नव्हते. जर मला तेच करायचे असते, तर मी त्यांना जन्मच दिला नसता. जेव्हा तुम्ही कठीण काळातून जात असता, तेव्हा तुमचे पालकच तुम्हाला सर्वांत जास्त पाठिंबा देत असतात. इतर कोणीही तुम्हाला मदत करीत नाही. मी वयाच्या १९ व्या वर्षी पुन्हा काम करू लागले. कारण- मला माझ्या पालकांवर ओझे बनून राहायचे नव्हते.
“माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल जाणून घ्यायचे नाही”
पुढे अभिनेत्रीने असाही खुलासा केला की, तिची दोन्ही मुले सागर आणि क्षितीज ढोलकिया हे त्यांच्या वडिलांना कधीच भेटले नाहीत. ती म्हणाली, “माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल जाणून घ्यायचे नाही. त्यांना त्यांच्या वडिलाबद्दल सांगण्याचा, आम्ही अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी नेहमी हेच सांगितले की, आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही जाणून घ्यायचे नाही.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने असेही सांगितले की, माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम यावे, माझा कोणीतरी जो़डीदार असावा यासाठी खूपदा मला प्रोत्साहन दिले गेले. पण, मी अनेकांना मित्र बनवले. माझे कामावर लक्ष केंद्रित होते.
तिच्या रिलेशनशिपवर ती म्हणाली, “कोणीही माझ्यावर प्रेम केले नाही, हे सत्य आहे. त्यांनी माझ्यातल्या काही काही गोष्टींवर प्रेम केले. पण, त्यांना ही गोष्ट समजली नाही, त्यांनाही तसेच प्रेम मिळते. तुमच्यावर कोणीही पूर्ण प्रेम करत नाही. माझा विश्वास आहे की, फक्त पालक तुम्ही आहात, तसे तुम्हाला स्वीकारतात आणि तुमच्यावर प्रेम करतात.”
अभिनेत्रीला कसौटी जिंदगी की या मालिकेतून ओळख मिळाली. कोमोलिका या भूमिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ती ‘देख भाई देख’, ‘घर एक मंदिर’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘मेहंदी तेरे नाम की’ व ‘कहीं तो होगा’ यांसारख्या शोमध्येदेखील दिसली आहे. उर्वशीने बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी होऊन, या पर्वाचे विजेतेपद मिळवले.