Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी ( १२ जून ) घडली. विमानाने दुपारी उड्डाण घेतल्यावर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला. या विमान अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला आहे. सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. तर, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विमान प्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अशातच लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरची पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिता काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीसह युरोप फिरायला गेली होती. यावेळी तिने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला होता. या ९ तासांच्या प्रवासादरम्यान आलेला वाईट अनुभव अंकिताने तिच्या पोस्टमध्ये सांगितला आहे.
“अलीकडेच मी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला. एसी व्यवस्थित काम करत नव्हता, याशिवाय स्क्रीन्सची अवस्था सुद्धा अतिशय वाईट होती आणि जेवणाबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. ९ तासांचा विमानप्रवास आम्ही या परिस्थितीत केला आहे. विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचा जीव धोक्यात का घालत आहेत?” असा सवाल ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने तिच्या पोस्टमध्ये केला आहे.

अंकिताप्रमाणे आकाश वत्स नावाच्या युजरने देखील एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव आल्याचं एक्स पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. दिल्ली ते अहमदाबाद हा प्रवास एअर इंडियाच्या एआय-१७१ याच क्रॅश झालेल्या विमानातून केल्याचा दावा आकाशने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. जगातील अनेक देशांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तर, टाटा ग्रुपने नुकसान भरपाई जाहीर केली आहे.