Kon Hotis Tu Kay Zhalis Tu Actress Share Video : मुंबईत गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. सोमवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजूनपर्यंत सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेला पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी आलं आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्या अनेक सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मंगळवारी पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तरी काही मुंबईकर या साचलेल्या पाण्यातून वाट काढत कामाच्या ठिकाणी जाताना पाहायला मिळालं.

सामान्य मुंबईकरांप्रमाणेच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीसुद्धा तुंबलेल्या पाण्यातून आपल्या कामाचं ठिकाण गाठलं. स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी साचलेल्या पाण्यातून सेटवर गेल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. मनोरंजनाला ब्रेक नाही म्हणत गुडघाभर पाण्यातून वाट काढत दोघे शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले.

अशातच याच मालिकेतील रेवती लेले या अभिनेत्रीने सुद्धा नवा व्हिडिओ शेअर करत सेटवरील परिस्थिती दाखवली आहे. मालिकेच्या सेटवर प्रचंड पाणी साचल्याने तिच्यासह साक्षी गांधी आणि साक्षी महाजन या अभिनेत्रींनीही चक्क ट्रकने प्रवास केला, याची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यामुळे सेटला जणू एखाद्या वॉटर पार्कसारखं स्वरूप आलं होतं. अथक परिश्रम करून त्यांनी मालिकेचं शूटिंग केलं.

दरम्यान, पावसाच्या पाण्यातून वाट काढतानाचा हा अनुभवव रेवतीने तिच्या शब्दांत व्यक्त केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती असं म्हणते, “काय दिवस होता… संपूर्ण शहरात पाणी साचलेलं, रस्ते जलमय आणि आम्हाला आमच्या गाड्याही सेटच्या बाहेर पार्क कराव्या लागल्या. तुम्ही कल्पना करू शकता का, आम्ही सेटवर कसे पोहोचलो? तर ट्रकने! खरंच, “शो मस्ट गो ऑन”… आणि तो झाला सुद्धा! संपूर्ण टीम, क्रूपासून कलाकारांपर्यंत – सगळे वेळेवर पोहोचले आणि दिवसभर कुठलीही तक्रार न करता काम केलं. सगळ्या टीमचं खूप कौतुक.”

रेवतीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी याबद्दल कलाकारांचं कौतुक केलं आहे. ‘वाह ट्रकने प्रवास’, ‘खरंच हे कौतुकास्पद आहे’, कलाकार आणि सगळ्या टीमच्या जिद्दीला सलाम’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्समध्ये काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.