स्टार प्रवाह २८ एप्रिलपासून ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून स्टार प्रवाहचीच लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याआधी ही जोडी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत पाहायला मिळाली होती.
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका सुरू होऊन दोन महिने सुरू झाले आहेत. या कालावधीत मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची आवडती मालिका बनत आहे. अशातच आता मालिकेत दोघांच्या लव्हस्टोरीचे सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. या नव्या ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
सध्या मालिकेत निशा आणि मंदार यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. मंदारचं खरं रूप कावेरीला माहीत असल्याने ती या लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठी ती नकळत निशाची पत्रिकाही बदलते. पण कावेरीचा हा प्लॅन तिच्यावर उलटतो. मंदार त्याची नवीन खेळी खेळत पत्रिकेतील दोष जावा म्हणून एक कठीण उपाय करायला सांगतो. पण निशाला शिक्षा होऊ नये म्हणून कावेरी हे सगळं तिने केलं असल्याचं सांगते.
यावर माँ तिला निशाच्या लग्नात सहभाग न घेण्याची शिक्षा करतात. पण कावेरी चलाखीने त्यांची माफी मागते आणि या शिक्षेसाठी तिला माफ करा असं म्हणते. यावर माँदेखील तिला माफ करतात. अशातच आता मालिकेत निशा आणि मंदार यांच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. १५ जुलैच्या भागात त्यांच्या साखरपुडा होत असल्याचं पाहायला मिळणार आहे. एकीकडे निशा-मंदार यांचं लग्न होणार आहे; तर दुसरीकडे यशसुद्धा कावेरीच्या प्रेमात पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोण होतीस तू, काय झालीस तू मालिका प्रोमो
मालिकेच्या या नव्या ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कावेरी यशला “तुला कशी बायको हवी आहे?” असा प्रश्न विचारते. तिच्या या प्रश्नावर यश फक्त एकटक तिच्याकडेच बघत बसतो. यानंतर तो मनातल्या मनात “तुमच्यासारखी” असं उत्तर देतो. यावर कावेरी त्याला “तुम्ही काही बोललात का?” असं विचारते. मग यश तुम्ही काही ऐकलं का? असा प्रश्न विचारतो.
यशच्या मनात कावेरी विषयी हळूहळू प्रेम बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तो तिच्याकडे त्याच्या भावना अजूनही व्यक्त करु शकला नाही. त्यामुळे आता यश कावेरीकडे त्याची प्रेमभावना व्यक्त करेल का? कावेरी त्याचं प्रेम स्वीकारेल का? तसंच दोघांच्या या प्रेमाला माँ कसं स्वीकारतील? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच यश-मंदारचे हे लग्नही यशस्वी होईल का? की कावेरी हे लग्न मोडेल? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील भागांत पहायला मिळतील.