Kon Hotis Tu Kay Zalis Tu Fame Actress Wedding : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या नवीन ट्विस्ट आणि हटके कथानकामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच आता मालिकेत यश-अमृता आणि कावेरी-उदय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मालिकेत याच लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

मालिकेत तर लग्न होत आहेच; मात्र या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे आणि याबद्दल स्वत: तिनेच माहिती दिली आहे. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. या लग्नाची तिची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. याबद्दल साक्षीने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं.

राजश्री मराठी शोबझशी साधलेल्या संवादात साक्षी गांधी आणि साक्षी महाजन यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा साक्षी महाजन हिने कबुली देत पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी तिची सहकलाकार आणि मैत्रीण साक्षी गांधीनेही दुजोरा दिला.

यावेळी साक्षी असं म्हणाली, “हो… मी पुढच्या वर्षीच लग्न करणार आहे. त्यामुळे खूप काय काय डोक्यात आहे. कोणती स्टाइल करायची? कोणतं फाउंडेशन लावायचं? कुठल्या रंगाची साडी? वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत. सगळं सुरू आहे. डोक्यात भरपूर काही. लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळेल.”

यानंतर साक्षी गांधी असं म्हणाली की, “लग्नाचा विषय निघाला की ती खूपच उत्सुक होते. तिचं म्हणणं आहे की, माझं लग्न एकदाच होणार आहे ना… बाकी सगळ्या गोष्टी मी दहावेळा करेन. पण लग्न एकदाच होणार आहे ना… तिच्याकडून मला काही नवीन शब्द कळले आहेत. जसे की, वेडिंग फाउंडेशन, वेडिंग लिपस्टिक, वेडिंग व्हॅनिटी असं बरंच काही सुरू आहे.”

साक्षी महाजन इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे साक्षी महाजनने सांगितलं, “मालिकेत आता जे हे काही लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यावरून सुकन्या मोने ताई, मंदार जाधव असे सगळेच जण चिडवत आहेत. सगळं छान सुरू आहे. माझ्या लग्नात साक्षी गांधी ही माझी करवली असणार आहे. तिला मी आधीच सांगितलं आहे की माझी चिडचिड होऊ नये, यासाठी ती आजूबाजूलाच हवी.”

दरम्यान, साक्षी गांधी (यमुना) आणि साक्षी महाजन (विद्या) या मालिकेत नेहमीच एकमेकींच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, प्रत्यक्षात त्या दोघी घनिष्ट मैत्रीणी आहेत. दोघी सोशल मीडियाद्वारे एकमेकींबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतात.