Kon Hotis Tu Kay Zalis Tu : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेतील यश-कावेरी म्हणजेच अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकानुसार दोघांनी मिळून नुकताच मकरंदचा खरा चेहरा समोर आणला. त्यानंतर आता मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत अभिनेत्री रेवती लेलेची एन्ट्री झाली आहे. यशच्या बालमैत्रीणीची भूमिका ती साकारत आहे. तिच्या येण्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळं वळण आलं आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून यशला कावेरीविषयी प्रेम वाटत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्याने त्याचं प्रेम अजूनही व्यक्त केलेलं नाही. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत आहे.

अशातच तो आता लवकरच कावेरीला त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहे. यासाठी यशने कावेरीला एक साडीसुद्धा भेट म्हणून दिली आहे, जी कावेरी मंगळागौरीच्या कार्यक्रमात नेसणार आहे. यश कावेरीच्या प्रेमात आहेच; पण कावेरीलासुद्धा त्याच्याविषयी प्रेम वाटत आहे, असं तिला जाणवत आहे. मात्र दोघांची ही लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच त्यात विघ्न येणार आहे.

मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात माईंनी अमृताचं लग्न यशबरोबर करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबद्दल अद्याप यशला काही कल्पना नाही; पण लवकरच याबद्दल कावेरीला कळणार आहे. मालिकेच्या या कथानकासंबंधित एक प्रोमो समोर आला आहे.

या नव्या प्रोमोमध्ये कावेरी यशने दिलेली साडी निरखून पाहत असते, तेवढ्यात माई तिला हाक मारतात आणि यश आणि अमृताच्या लग्नाबद्दल तिला सांगतात. यावेळी त्या तिला असं म्हणतात, “तुझ्याशी लग्न करून उदयने माझा मान राखला नाही, पण अमृताबरोबर लग्न करून माझा यश माझा मान राखणार.” हे ऐकताच कावेरीला धक्का बसतो आणि तिच्या हातातली साडी खाली पडते.

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिका प्रोमो

प्रोमोमध्ये पुढे यश कावेरीचा हात हातात घेत तिला प्रेमाची मागणी घालतो. यश कावेरीला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं म्हणत “तुझं हीए माझ्यावर प्रेम आहे का?” असं विचारतो. आता यशच्या प्रश्नावर कावेरी काय उत्तर देणार? हे येत्या भागात कळेल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत होते. यश-कावेरीच्या लव्हस्टोरीसाठी ते आतुर होते; पण आता या लव्हस्टोरीत अमृता आल्याने लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. दरम्यान, येत्या ७ आणि ८ तारखेला हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.