Actress Pooja Banerjee Second Pregnancy : ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट करून तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे. ३३ वर्षांची मुंबई सोडून दिल्लीला राहायला गेली आहे. दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग आणि मुंबई सोडण्याबद्दल ती व्यक्त झाली आहे.
पूजाच्या पतीचे नाव संदीप सेजवाल असून त्यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगी आहे. गरोदर असली तरी पूजाने तिचं काम थांबवलेलं नाही. “असं वाटतं की २४ तासही कमी आहेत. मी मुंबईत राहत असेन वा नसेन, काम करतेय किंवा नाही तरीही मी खूप व्यग्र राहतेय. वेळ खूप झपाट्याने निघून जातो. मी माझ्या शेड्यूल व स्टुडिओच्या कामात इतकी व्यग्र असते की वेळ जातो कुठे? असा प्रश्न मला पडतो. शेड्यूल थोडं थकवणारं आहे, कारण गरोदर असूनही मला प्रवास करावा लागतोय. पण मी एंजॉय करतेय आणि माझ्या बाळांना गोष्टी, अनुभव सांगण्यास खूप उत्सुक आहे,” असं पूजा बॅनर्जी आयएएनएसशी बोलताना म्हणाली.
दुसऱ्या बाळाबद्दल पूजा म्हणाली…
दुसऱ्या बाळाचं नियोजन करण्याबद्दल पूजाने सांगितलं की तिच्या पहिल्या बाळाला भाऊ किंवा बहीण असावी असं तिला नेहमीच वाटत होतं. तिचा पती संदीपचंही असंच मत असल्याचं तिने नमूद केलं. “संदीपही असाच विचार करतो. मी दोन भावांबरोबर मोठी झाले, त्यामुळे मला भाऊ-बहिणीच्या नात्याचं महत्त्व चांगलंच माहीत आहे,” असं पूजा बॅनर्जी म्हणाली.
अभिनयात पुनरागमन करण्याबद्दल पूजा म्हणाली, “हे सगळं माझ्या आरोग्यावर आणि माझ्या मुलांच्या गरजांवर अवलंबून आहे. मला स्वतःवर जास्त दबाव नकोय, त्यामुळे मी स्वत:ला वेळ देईन आणि मला कोणत्या संधी येतात ते पाहीन.”
पूजाने सांगितला दिल्ली-मुंबईतील फरक
पूजा मुंबई सोडून नवी दिल्लीला राहायला गेली आहे. “मुंबईपेक्षा हे शहर खूप वेगळे आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे, कुटुंबातील अनेक सदस्य मुलांची काळजी घेतात. घरात नेहमी कोणतं ना कोणतं सेलिब्रेशन होत असतं. मुख्य म्हणजे इथे मुंबईपेक्षा जास्त जागा आहे,” असं पूजाने नमूद केलं.
मुंबईला परतण्याबद्दल पूजा व्यक्त झाली. “मला मुंबईची आठवण येते. मला कॅमेरा आणि अभिनयाची खूप आठवण येते. पण मला माझ्या मुलांना वाढवण्यासाठी, त्यांना खेळण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे आहे याचा मला आनंद आहे,” असं पूजा म्हणाली.