गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठी भाषेच्या वादावरून राज्याचं आणि देशाचं वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्र सरकारने नवीन शालेय शिक्षण धोरण आणल्यापासून हिंदी भाषा सक्तीची चर्चा सुरू झाली.
शालेय शिक्षणातील पहिलीपासूनच्या हिंदी भाषा सक्तीच्या सरकारच्या निर्णयावर अनेकांनी विरोध दर्शवला. राजकीय क्षेत्राबरोबरच मनोरंजन क्षेत्रातूनही या हिंदी सक्तीला जोरदार विरोध करण्यात आला. हिंदी सक्तीबद्दल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
अशातच आता हिंदी अभिनेत्री प्राची शाह यांनीदेखील या हिंदी-भाषेच्या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्राची शाह यांनी व्हायरल बॉलीवूड या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी महाराष्ट्रीयन आहे. माझी आई महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे मला मराठी खूप चांगलं येते. मी पुण्याची आहे. त्यामुळे मराठी भाषा माझ्या खूपच जवळची आहे आणि ती कायमच राहील. कारण माझी ती मातृभाषासुद्धा आहे.”
प्राची शाह इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे त्या म्हणाल्या, “मला असं वाटतं की, आपण सगळे एक आहोत आणि हे आपण कायमच लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यांमध्ये आपलेपणाची एक प्रेमळ भावना आहे आणि ती असलीच पाहिजे. प्रत्येक भाषेची एक वेगळी ओळख आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. तसंच प्रत्येक एका शहराचं आणि राज्याचंसुद्धा वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीला महत्त्व मिळालं पाहिजे. प्रत्येक क्षेत्राची, प्रांताची वेगळी ओळख असते. तशी महाराष्ट्राची विशेष ओळख ही मराठी आहे.”
दरम्यान, प्राची शाह प्राची शाह पांड्या यांनी ‘कोशिश-एक आशा’, ‘कुंडली’, ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘पिया का घर’, ‘भाभी’, ‘रंगोली’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ- फिर एक बार’ आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ अश्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी ‘इसी लाईफ में’, ‘स्टूडंट ऑफ द इयर’, ‘राजा नटवरलाल’, ‘एबीसीडी २’, ‘जुडवा २’, ‘लक्ष्मी’, ‘हम दो हमारे दो’ या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. याशिवाय ‘इचार ठरला पक्का या मराठी चित्रपटातही त्या पाहायला मिळाल्या. अशातच आता त्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या भागामध्येही पाहायला मिळणार आहेत.