अभिनेता संकेत पाठक व अभिनेत्री सुपर्णा पाठक हे दोघे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘दुहेरी’ या मालिकेमुळे. यामध्ये दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याच मालिकेमुळे ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि त्यावेळीच त्यांचे सुर जुळले. या जोडीने नुकतीच एक मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे.
संकेत व सुपर्णा यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. ‘दुहेरी’ मालिकेनिमित्त झालेली भेट, प्रेम, रिलेशनशिप, लिव्ह इन आणि लग्न याबद्दल या जोडीने यामध्ये सांगितलं आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संकेतने, त्याने पहिल्यांदा सुपर्णाला जेव्हा दुहेरी मालिकेच्या सेटवर पाहिलं होतं तेव्हाच त्याला ती आवडली होती आणि त्या मालिकेमुळेच आज ते एकत्र आहेत. असं सांगितलं आहे.३० मे २०१६ रोजी ‘दुहेरी’ ही मालिका सुरू झाली होती. जवळपास दोन वर्षे ही मालिका चालली. या दरम्यान संकेत व सुपर्णा एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं या जोडीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमधून सांगितलं आहे. त्यामुळे लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना ५-६ वर्षे ओळखत असून दोघेही लग्नापूर्वी लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संकेत म्हणाला, “लग्नापूर्वी दोन वर्षे मी व सुपर्णा एकत्र राहत होतो, त्यावेळी सुपर्णा माझ्या घरी राहत होती. ती दोन वर्षे मी व माझ्या कुटुंबीयांबरोबर राहिली, त्यामुळे लग्नाआधीच तिची माझ्या कुटुंबीयांशी चांगली ओळख झाली होती.” लिव्ह इनमध्ये राहण्यामागचं कारण सांगत संकेत म्हणाला, “तेव्हा नुकतंच लॉकडाउन सुरू झालेलं आणि तेव्हा सुपर्णा दुसरं घर शोधत होती. त्यावेळी कुठे घर शोधणार, त्यापेक्षा तू आमच्या घरी येऊन राहा असं मी तिला म्हटलं. त्यानंतर ती लग्नापूर्वी दोन वर्षे माझ्या घरी मी, माझ्या तीन बहिणी व आई-बाबांबरोबर राहिली.” यासह सुपर्णाने लग्नापूर्वी संकेतच्या घरी राहण्याबाबतचा व लिव्ह इनबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.
सुपर्णा म्हणाली, “लग्नापूर्वी मी दोन वर्षे संकेतच्या घरी त्याच्या कुटुंबीयांबरोबर राहिले. त्याच्या तीन बहिणींबरोबर माझी तेव्हा चांगली मैत्री झाली. त्याच्या आईनेही मला खूप समजून घेतलं. सुरुवातीचे दोन-तीन महिने मला त्यांच्या घरामध्ये राहणं जरा अवघड गेलं, पण नंतर मी तिथे खूप छान रुळले. त्यामुळे मला असं वाटतं, आताच्या काळात वाढत असलेली घटस्फोटाची संख्या बघता लग्नापूर्वी निदान एक महिना तरी एकमेकांबरोबर राहून पाहिलं तर आपल्याला एकमेकांच्या स्वभावाचा अंदाजा येतो आणि लग्नानंतर वाद होण्यापेक्षा, नंतर नातं तुटण्यापेक्षा आधी जर ती किंवा तो आपल्यासाठी योग्य आहे का हे कळलं तर लग्नानंतर अडचणी येणार नाहीत.”
लिव्ह इनबद्दल बोलताना पुढे सुपर्णा म्हणाली, “त्यामुळे लिव्ह इन आजच्या काळातील जोडप्यांसाठी एक उपाय असू शकतो.” दरम्यान, संकेत व सुपर्णा यांनी २०२३ साली एप्रिल महिन्यात लग्न केलं होतं. आता या दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. संकेत व सुपर्णा यांनी मंदिरात लग्न केलं होतं; तर त्यांच्या लग्नाच्या दिवशी अनेक मजेशीर किस्से घडल्याचं दोघांनी या मुलाखतीमधून सांगितलं आहे.