मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड, शिवानी नाईक असे अनेक मराठी कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा याच महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करत या अभिनेत्रीने चाहत्यांना विवाहबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज दिली होती.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मल्टिस्टारर मालिकेत अनेक दमदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेतील नंदिनी व काव्याची लहान बहीण आरुषी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. अनुष्का ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवशी लग्न करणार आहे. गेली काही वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर अनुष्का व मेघन यांच्यात चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर पुढे जाऊन प्रेमात झालं आणि येत्या १६ नोव्हेंबरला हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. अनुष्काने नुकतेच तिच्या Bride To Be चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनुष्काच्या जवळच्या मित्रमंडळीनी तिच्यासाठी खास Bride To Be पार्टीचं आयोजन केलं होतं. तिने या पार्टीदरम्यानचे सुंदर फोटो शेअर करत सगळ्या मित्रमंडळींचे आभार मानले आहेत. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अनुष्का व मेघन यांच्या लग्नाला आता फक्त ६ दिवस उरले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन अनुष्का-मेघनचं केळवण केलं होतं. त्यांच्या केळवणाला जान्हवी, लक्ष्मी, भावना, सिद्धू, वीणा, संतोष, हरीश, वेंकी आणि शांता अशी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
