Kashmira Kulkarni opens new studio: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या, रम्या तसेच इतर पात्रेदेखील प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत.

मालिकेत रम्या ही सतत नंदिनी व काव्याला त्रास देताना दिसते. रम्या ही भूमिका अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने साकारली आहे. आता अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

कश्मिराने सुरू केला नवीन स्टुडिओ

अभिनेत्रीने गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या नवीन स्टुडिओचे उदघाटन केले आहे. कश्मिराने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने खुलासा केला की, तिने नवीन स्टुडिओची सुरुवात केली आहे. अभिनेत्री म्हणाली, “मी कोकू स्टुडिओ उघडलेला आहे. त्याचं गणेश चतुर्थीच्या दिवशी उदघाटन झालेलं आहे. बाप्पाच्या आशीर्वादानं सुरुवात केली आहे.”

“माझ्या मनात सध्या मिश्र भावना आहेत. मी सध्या भावूक झाली आहे. कारण- आपल्या स्वत:च्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठाप करण्यासाठी बाप्पांनी मला १२ वर्षं वाट बघायला लावली होती. लहानपणापासून घरी ११ दिवसांचा गणपती आणि इतर सगळ्या गोष्टी असायच्या. पण, १२ वर्षं ते थांबलेलं होतं आणि आता पुन्हा त्याची सुरुवात झाली आहे.”

पुढे अभिनेत्रीने स्टुडिओला कोकू असे नाव का दिले, स्टुडिओची कल्पना कशी सुचली, यावरही वक्तव्य केले. ती म्हणाली, “वामा सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही फिरत होतो. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक रवी कोंडके यांच्याबरोबर चर्चा सुरू होती की, आपलं क्षेत्र बेभरवशाचं आहे. आपण काहीतरी वेगवेगळ्या व्यवसायांची सुरुवात करूयात. आपलं ठोस उत्पन्न असायला पाहिजे, अशा चर्चा झाल्या होत्या.

“माझी आवड फूडलाइनमध्ये असल्याने क्लाउड किचन सुरू करूयात, असं आमचं ठरलं होतं. त्यासाठी आम्ही जागा बघायला सुरुवात केली. एक दिवस सरांनी एक जागा सुचवली आणि तिथे स्टुडिओ सुरू करण्याबाबत ते बोलले. मला व्यवसायाची आवड असल्यानं कोणत्या क्षेत्रात संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, अशा चर्चा चालू असतात. त्यामुळे ही गोष्ट माहीत होती की, स्टुडिओची खूप गरज आहे. कारण- मायक्रो सीरिज, वेब सीरिज, फोटोशूट, जाहिराती, चित्रपट यांसाठी स्टुडिओंची मोठ्या प्रमाणात गरज आहे.

“कमी बजेटमध्ये एकाच ठिकाणी जास्त, वेगवेगळे सेटअप आपण उभे करूयात; जेणेकरून जे इथे शूटिंग करतील, त्यांना एकाच ठिकाणी काम करता येईल आणि सतत फिरण्याची गरज पडणार नाही. रवीसर स्वत: आर्ट डायरेक्टर असल्यानं त्यांची संकल्पना आणि त्यांची टीम यांमुळे हे १५ दिवसांत उभं झालं आहे.”

“नावाची गंमत अशी आहे की, हे नाव रवीसरांनी सुचवलं होतं आणि माझ्या अभ्यासानुसार मी नेहमी अंकशास्त्रानुसार त्याची ऊर्जा, अर्थ काय असतो, हे बघत असते. मी इंटरनेटवर त्याचा अर्थ पाहिला, तर जपानी भाषेत त्याचा अर्थ सापडला. कोकु म्हणजे विश्व, समुद्र ज्याच्याकडे भांडार असते अशा गोष्टी. पण कोकु, असं नाव देण्याचं कारण म्हणजे माझे जे भागीदार आहेत, त्या रवीसरांचं आडनाव कोंडके. त्यातील को आणि माझ्या कुलकर्णी आडनावातलं कु, असं मिळून कोकु असं नाव दिलंय”, असे म्हणत अभिनेत्रीने तिने स्टुडिओला कोकु, असे नाव का दिले याबद्दलची माहिती दिली.