Lagnanantar Hoilach Prem: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका ठरत आहे. या मालिकेतील विविध पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. प्रत्येक पात्राचा स्वभाव, वागण्याची पद्धत, प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची पद्धत वेगळी दिसते; त्यामुळे विविध छटा असलेली ही पात्रे प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या मालिकेत काव्या, पार्थ, जिवा, नंदिनी, रम्या, वसू आत्या, मानिनी अशी अनेक पात्रे पाहायला मिळतात. भांडणे, भावंडांमधील प्रेम, काळजी, गैरसमज, विविध स्वभाव असलेल्या काव्या व नंदिनी आणि जिवा व पार्थ यांच्यात होणारे गैरसमज, असे अनेक प्रसंग मालिकेत पाहायला मिळतात.

या मालिकेत पार्थ व जिवा यांची आई आणि काव्या व नंदिनी यांची सासू मानिनी आहे. मानिनी ही भूमिका अभिनेत्री ऋजुता देशमुखने साकारली आहे. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर मानिनीच्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मानिनीच्या चेहऱ्यावर विविध भाव दिसत आहेत.

शेवटच्या फोटोत मानिनी रागात असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवर अभिनेत्रीने ‘मानिनीची सटकली’ असे लिहिल्याचे दिसत आहे; तर हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “मानिनी सराव करताना, वाक्य पाठ करताना, पार्थ फोटो क्लिक करत सुटला”, असे लिहिले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

त्यावर मालिकेत पार्थची भूमिका साकारणाऱ्या विजय आंदळकरने “साधी भोळी माझी आई”, असे लिहित हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर चाहत्यांनीदेखील ऋजुताचे कौतुक केले. “खरंच ऋजुता तुझा आताचा ट्रॅक खूप छान चालू आहे, तुझा राग, तुझी तळमळ सगळंच खूप छान करतेस.”

“ऋजुता ताईला भूमिका भारी मिळाल्या आहेत. ती त्या भूमिका उत्तम पद्धतीने निभावते. ‘कळत नकळत’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘आता लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमधील तिच्या भूमिका उत्तम आहेत”, “अशी सासू सगळ्यांना मिळाली तर बरं होईल. तुमचं वेगळेपण भारी, जगात भारी अभिनय, कमाल”, “छान झालं, वेगळी निराळी सासू असते, “विक्रम देशमुख बरोबर जी भांडणे होत आहेत, त्यात तुमची ॲक्टिंग आणि डायलॉग्ज कमाल आहेत”, “मला तर या आई खूपच आवडतात. अतिशय छान, प्रिय आणि दमदार व्यक्तिमत्व”, “तुम्ही खूप मस्त आहात, मानिनी काकू”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी अभिनेत्रीच्या पात्राचे, तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत आगामी काळात काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.