Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Bought New House : आपलं हक्काचं घरं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, मग तो सामान्य माणूस असो वा कलाकार; स्वत:चं घर खरेदी करणं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. अशातच आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील अभिनेत्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. नुकतंच त्याने याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ देशमुख ही भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरने मुंबईत हक्काचं घरं खरेदी केलं आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याची पत्नी अभिनेत्री रुपालीसह ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये या जोडीने त्यांच्या घराबाबत सांगितलं आहे.
नवीन घराबद्दल विजय आंदळकरची प्रतिक्रिया
नवीन घराबद्दल विजय म्हणाला, “मला या इंडस्ट्रीत जवळजवळ १८ वर्षे झाली आहेत. जेव्हा आलो होतो तेव्हा अंधेरीतील आराम नगर परिसरात छोट्या खोलीत आम्ही चौघं राहायचो. तेव्हा प्रत्येकी १८०० रुपये असे पैसे आम्ही भरायचो. तिथून माझा प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर भाड्याने वन आरकेमध्ये राहिलो, नंतर वन बीएचके आणि आता देवाच्या कृपेने रेंटचा प्रवास थांबला आहे. देवाच्या आशीर्वादाने २ बीएचके घर खरेदी केलं आहे. मुंबईत काम करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचं या शहरात स्वत:चं घर असावं असं स्वप्न असतं, आता ते पूर्ण झालं आहे.”
मुलाखतीमध्ये विजय पुढे म्हणाला, “जेव्हा मी पुण्याहून मुंबईला यायचो तेव्हा नेहमी मनातल्या मनात म्हणायचो की, या लेक व्ह्यूला घर खरेदी केलं पाहिजे आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे.” विजयने मुंबईतील पवई परिसरात २ बीएचके अस लेक व्ह्यू असलेलं स्वत:चं घर खरेदी केलं आहे.”
दरम्यान, विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. विजयने चित्रपटातही काम केलं आहे. त्याने ‘ढोल ताशा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर अभिनेत्याने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’, ‘पिंकीचा विजय असो’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.