Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Shares his Acting Journey : विजय आंदळकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये मुख्य नायक म्हणून काम केलं आहे. सध्या तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ देशमुख ही भूमिका साकारत असून मालिकेत तो एक आर्किटेक्ट असल्याचं पाहायला मिळतं. पण, विजयचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालं आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये विजय पार्थ देशमुख ही भूमिका साकारताना दिसत आहे, जो एक नामांकित आर्किटेक्ट असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत आर्किटेक्टची भूमिका साकारणाऱ्या विजयने खऱ्या आयुष्यामध्ये वकिलीचं शिक्षण घेतलं असून तो एक वकील आहे. याबाबत त्याने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
विजयने नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीमध्ये सांगितलं की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याने स्पर्धा परीक्षाही दिली असून त्याला एक मोठा सरकारी अधिकारी व्हायचं होतं. विजयला यामध्ये “तू मॅनिफेस्टेशनवर विश्वास ठेवतोस तर मग अशी कोणती गोष्ट आहे, जी तू मॅनिफेस्ट केली आहे आणि तुला मिळाली,” असा प्रश्न विचारण्यात आलेला.
विजय याबाबत म्हणाला, “अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं तर मला इंडस्ट्रीत यायचं होतं. मला हिरो व्हायचं वगैरे असं काही नव्हतं; मला फक्त अभिनय करायचा होता. पुण्यामध्ये माझा एक डॉक्टर मित्र आहे. तो नाटक वगैरे करायचा, ऑडिशन द्यायचा; तेव्हा तो मला म्हणायचा, चल, तुझी बॉडी वगैरे चांगली आहे, दिसायला बरा आहेस.”
पुढे विजय याबाबत सांगताना म्हणाला, “असं करत मी बऱ्याच ऑडिशन्स दिल्या. नंतर २००९ साली ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ नावाची एक स्पर्धा झाली होती. पण, मी त्यातून लवकर बाहेर पडलो. तिसऱ्या चौथ्या फेरीनंतर मी बाहेर पडलो. त्यानंतर तीन वर्षे मी वकिलीचं शिक्षण घेत होतो, एमपीएससीची परीक्षा देत होतो. तेव्हा तीन वर्षे मी इंडस्ट्रीपासून लांब होतो.”
विजय पुढे अभिनयक्षेत्रातील प्रवास सुरू होण्याबद्दल म्हणाला, “नंतर तीन साडे तीन वर्षांनंतर मी एमपीएससीची परीक्षा देऊन बाहेर पडलो आणि फोन पाहिला तर आईचा फोन आला होता. आई म्हणाली, अरे कोणीतरी निर्माता आहे, त्याचा फोन आला होता. त्याला फोन कर, म्हणून मी फोन केला, त्याच्याशी बोललो आणि तेव्हाच ‘ढोल ताशा’ हा पहिला सिनेमा मिळाला. मी यासाठी अजिबात प्रयत्न केले नव्हते. जेव्हा केले होते तेव्हा काम मिळाले नाही.”
विजय पुढे म्हणाला, “प्रयत्न केल्यानंतर काही झालं नाही, म्हणून मग म्हटलं चला हे बंद करूयात, काहीतरी सरकारी अधिकारी वगैरे व्हायचं बघूयात. तेव्हा प्रयत्न बंद केले आणि झालं; म्हणून मला वाटतं नशिबात असतं ते होतं.”