Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Talk’s About Dnyanada Ramtirthkar : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर व विजय आंदळकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच विजयने त्याची व ज्ञानदाची ऑफस्क्रीन मैत्री कशी आहे याबद्दल सांगितलं आहे.
लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहेत. यानिमित्त ‘स्टार प्रवाहा’ने प्रेक्षकांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यामधून कलाकार वेगवेगळ्या गाण्यांवर सादरीकरण करताना दिसणार आहेत. याच सोहळ्याच्या ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’च्या रेड कार्पेटवर विजय व ज्ञानदाने हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत विजयने ज्ञानदाबरोबरच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल सांगितलं आहे.
या मुलाखतीत ज्ञानदा विजय त्याच्या लूकबद्दल सांगत असताना त्याला “तू छान दिसत आहेस, त्यामुळे तक्रार वगैरे न करता छान बोल” असं सांगते. त्यावेळी विजय तिला “मग तूसुद्धा छान कौतुक कर की” असं म्हणतो; यावरून त्या दोघांमध्ये नोकझोक सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर त्यांना त्यांच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल विचारण्यात आलं. ऑफस्क्रीनही तुम्ही असेच भांडत असता का असं विचारण्यात आलं.
ज्ञानदा रामतीर्थकरच्या मैत्रीबद्दल विजय आंदळकरची प्रतिक्रिया
ज्ञानदाबरोबरच्या ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल बोलताना विजय म्हणाला, “मी आपला साधा भोळा आहे. ती मला छळते, मग आमच्यात भांडणं होतात. ती मला काहीतरी बोलते, मग मीही तिला काहीतरी बोलतो; असं आमचं सतत काहीतरी चालले असतं.” ज्ञानदाला याबद्दल विचारल्यावर ती, “मला यावर काहीच बोलायचं नाहीये” असं म्हणते.
ज्ञानदाने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने विजय म्हणाला, “मी जे सांगितलं ते सगळं उलटं सांगितलं.” यावर ज्ञानदा “म्हणून मी म्हटलं मला काहीच बोलायचं नाहीये” असं म्हणताना दिसते. गणेशोत्सवानिमित्त या कार्यक्रमात ज्ञानदा व विजय म्हणजेच पार्थ व काव्या सादरीकरणही करणार असल्याचं त्यांनी या मुलाखतीतून सांगितलं आहे.
दरम्यान, ज्ञानदा व विजयला ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या सोहळ्यासाठी त्यांनी केलेल्या त्यांच्या लूकबद्दल वचारण्यात आलं. यावर ज्ञानदा म्हणाली, “या सोहळ्यासाठीचा संपूर्ण लूक माझा मीच केला आहे. सेटवर माझं व नंदिनीचं(अभिनेत्री मृणाल दुसानिस) याबाबत बोलणं झालं होतं, पण आम्ही गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करत होतो, त्यामुळे आम्हाला एकत्र फार वेळ मिळाला नाही, म्हणून आम्ही एकाच रंगाचे कपडे किंवा कुठललीही थीम न करता जमेल तसा लूक करण्याचा प्रयत्न केला.”