Lagnanantar Hoilach Prem Fame Vivek Sangle Talks About Ganesh Chaturthi : अभिनेता विवेक सांगळे अलीकडे चर्चेत आला ते त्याच्या नवीन घरामुळे. अभिनेत्यानं नुकताच त्याच्या मुंबईतील लालबाग येथील घरात गृहप्रवेश केला होता. अशातच आता यंदा त्याच्या नवीन घरात बाप्पाचं आगमन झालं आहे.

विवेक सांगळेने गणपती बाप्पासाठी त्याच्या नवीन घरात छान आरास केल्याचं त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यावेळी त्यानं कोविडनंतर गणेशोत्सवाबद्दल एक निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. विवेकनं नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती.

विवेक सांगळेची प्रतिक्रिया

विवेकला मुलाखतीत “या वर्षी तू कशा प्रकारची मूर्ती आणायची किंवा कशी सजावट करायची याबद्दल काही ठरवलं होतंस का?”, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून कोविडनंतर मी खूणगाठ बांधून घेतलीय की, मूर्ती असेल, तर ती शाडूच्या मातीची आणि त्यानुसार या वर्षीदेखील शाडूच्या मातीची मूर्ती आहे. मला असं वाटतं की, आपण कुठेतरी पर्यावरणासाठी हातभार लावणं गरजेचं असतं. लोकांना सतत उपदेश करण्यापेक्षा तुम्ही हे करा, असं करा म्हणण्यापेक्षा मी माझ्यापासून सुरुवात केली.”

विवेक पुढे म्हणाला, “तुम्ही उद्या येऊन डेकोरेशन बघाल, तर तेसुद्धा इको फ्रेंडलीच केलेलं आहे. कुठेही आर्टिफिशियल किंवा प्लास्टिक अशा गोष्टींचा वापर केलेला नाहीये. आणि माझा स्वत:चा अनुभव आहे की, बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीतच खूप छान आणि सुंदर दिसते.”

गेल्या १४ वर्षांपासून विवेक सांगळेच्या घरी बाप्पाचं आगमन होतं असून, तो ५-६ वर्षांपासून शाडूच्या मातीपासून घडवलेली गणेशमूर्ती खरेदी करतो, असं त्यानं यामध्ये सांगितलं आहे. त्याशिवाय या मुलाखतीत अभिनेत्याला “या वर्षी तुझं स्वत:चं घर झालं आहे. त्यामुळे यंदा बाप्पाकडे अजून काही मागणार आहेस का?” असं विचारण्यात आलं होतं.

विवेक सांगळेने बाप्पाकडे व्यक्त केली इच्छा

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विवेक म्हणाला, “आता माझं घर झालं आहे, ते माझ्या खूप स्वप्नांपैकी असलेलं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं आहे. अजून खूप स्वप्नं आहेत, जी बाप्पाला पूर्ण करायची आहेत. अर्थात, त्यासाठी मी मेहनतसुद्धा तितकीच घेणार आहे. त्यामुळे बाप्पाकडे इतकंच म्हणणं आहे की, जसं आतापर्यंत तू माझ्या पाठीशी उभा राहिला आहेस, तसाच इथून पुढेही राहा.”