Lagnanantar Hoilach Prem: अगदी कमी काळात पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांची जागा निर्माण केली आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका घराघरांत पोहोचली आहे.

पार्थ व काव्याचे त्यांच्या मनाविरूद्ध लग्न झाले आहे. तर जीवा व नंदिनी यांचे परिस्थितीमुळे लग्न झाले. पार्थ व नंदिनीचे लग्न ठरले होते. पण, ऐन लग्नावेळीच नंदिनीला किडनॅप करण्यात आले. पार्थचा लहान भाऊ जीवा नंदिनीला शोधण्यासाठी बाहेर पडला, तितक्यात गावकऱ्यांच्या दबावामुळे नंदिनीची लहान बहीण काव्या व पार्थचे लग्न लावून देण्यात आले. जीवा नंदनीला सुखरूप लग्नस्थळी घेऊन आला. तिथे आल्यानंतर त्यांना समजले की काव्या व पार्थचे लग्न झाले आहे. नंदिनी व जीवाला धक्का बसला.

काव्या व जीवाचे एकमेकांवर प्रेम होते, पण काव्याने स्वत:च्याच मोठ्या भावाबरोबर लग्न केले हे पाहून जीवाला वाईट वाटले. काव्याने या लग्नाला नकार दिला नाही, तिने त्याची वाट पाहिली नाही, म्हणून जीवाला राग आला. त्याच मांडवात नंदिनीने विचारले की तिला कोण स्वीकारेल, तेव्हा जीवा पुढे आला. त्याने तिच्याबरोबर लग्न करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर जीवा व नंदिनीचे लग्न झाले.

लग्नानंतर काव्याचा सतत चिडका स्वभाव प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता मात्र काव्या व पार्थ यांच्यामध्ये मैत्री होताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये काव्या व पार्थ यांच्यात संवाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

पार्थ व काव्यामध्ये होणार मैत्री

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काव्या पार्थला म्हणते की एकदा का मी मैत्री केली की ती मैत्री मी निभावल्याशिवाय राहत नाही.त्यावर पार्थ म्हणतो. “ठीक आहे बालिके, तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा. आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेऊ. पार्थचे ते बोलणे ऐकूण काव्या गालात हसताना दिसते. ते पाहून पार्थ तिला म्हणतो की बघा किती छान दिसताय. नाहीतरी एरवी मांजरीसारख्या दिसता. त्यावर काव्या त्याला म्हणते, तुम्हीसुद्धा देशमुखांचा बोका आहात.आर्किटेक्ट बोका. ते ऐकूण पार्थ हसू लागतो. काव्यादेखील हसताना दिसते.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “पार्थ-काव्यामध्ये बहरणार मैत्रीचं नातं”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “मस्त प्रोमो. काव्या हसताना सुंदरच दिसते. पार्थसुद्धा क्यूट दिसत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मी तर १० वेळा प्रोमो बघितला”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पहिल्यांदा काव्या पार्थमुळे हसली. आता मालिका बघण्याचा उत्साह वाढेल”, एका नेटकऱ्याने लिहिले, “दोघांची केमिस्ट्री भारी आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “एकच नंबर जोडी”, अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान,मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.