Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील जीवा, नंदिनी, काव्या व पार्थ ही पात्रे प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करताना दिसतात.
मनाविरुद्ध झालेली लग्ने, त्यातून झालेले गैरसमज, भांडणे, एकमेकांबरोबर राहणे असह्य झाल्यानंतर आता जीवा व नंदिनी आणि काव्या व पार्थ यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यावर त्यांना सांगण्यात येतं की, “घटस्फोट घेण्याआधी तुम्हाला कायद्यानुसार किमान सहा महिने एकत्र राहावं लागेल. त्यानंतर ही जोडपी सहा महिने एकत्र राहण्यास तयार झाल्याचे पाहायला मिळते.
आता जीवा व नंदिनी आणि काव्या व पार्थ यांच्यामध्ये मैत्रीची सुरुवात होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जीवा व नंदिनी त्यांच्या खोलीत आहेत.
जीवा नंदिनीला म्हणतो, आपल्या दोघांना झोपण्यासाठी बेडदेखील हवा आहे आणि आपण बाहेरही जाऊ शकत नाही. आपण लाइफ पार्टनर होऊ शकत नाही, पण चांगले रुम पार्टनर होऊच शकतो, असे म्हणत जीवा दोघांच्या मध्ये एक चादर टाकून बेडचे दोन भाग करतो. त्यानंतर तो नंदिनीकडे मंजूर? असे म्हणत हात पुढे करतो. नंदिनीदेखील हात मिळवत मंजूर असल्याचे सांगते.
तर दुसरीकडे काव्या व पार्थदेखील त्यांच्या खोलीत एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत आहे. काव्या पार्थला म्हणते की माणूस म्हणून एकमेकांशी आदर करतो तर कोणाला खाली जमिनीवर झोपायची शिक्षा का? काव्याच्या बोलण्यावर पार्थ सहमती दर्शवतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने ही मंजुरी ठरेल का नात्यांची नवीन नांदी? अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मालिका पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे. “या आधीच्या जीवा नंदिनीचे भांडण पाहण्यास जास्त उत्सुक आहे”, “आता मजा येणार”, “काव्या-पार्थ यांचे भांडण बघायला मजा येते”, “काव्या-पार्थमुळे मालिका बघायला मजा येते”, “जीवा-नंदिनी यांच्या रुम पार्टनर्सचा प्रवास पाहायला उत्सुक आहे.”




“अखेर जीवा आणि नंदिनीने रुम पार्टनर होण्याचे पहिले पाऊल उचलले. आता पुढच्या सहा महिन्यात जीवा आणि नंदिनी यांचे समीकरण कसे बदलते हे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे”, “जीवा-नंदिनी आणि त्यांची भांडणे. रूम पार्टनर म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे, आता ते आयुष्यभरासाठी कसे एकमेकांचे जोडीदार होतात ते पाहणे महत्त्वाचे आहे.”


दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.