Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट, कथा, कलाकारांचा अभिनय यांमुळे प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा, काव्या, नंदिनी व पार्थ ही पात्रे अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी झाली आहेत. गुंतागुंतीची नाती असली तरीही त्यांच्यातील केमिस्ट्री, वाद, भांडणे, प्रेम, काळजी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. त्यांच्या गोष्टीत पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे काव्या व जीवा यांचे एकमेकांवर प्रेम होते. पार्थ व नंदिनीचे लग्न ठरले होते. मालिकेत वसूआत्याच्या कारस्थानामुळे पार्थ व काव्याचे लग्न झाले आणि पार्थचे लग्न झाल्यामुळे नंदिनी व जीवा यांचे लग्न झाले.
लग्नानंतर काव्याने अनेकदा जीवा व इतरांना घटस्फोट घ्यावा, असे सुचवले; पण तिच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर पार्थ व काव्या, जीवा व नंदिनी यांच्यातील गैरसमज वाढले. त्यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यांना सहा महिने एकत्र राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर हळूहळू या जोडप्यांमध्ये बॉण्डिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता मात्र, काव्याचे लग्नाआधी कोणावर तरी प्रेम होते, हे मालिनीला समजणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने लग्नानंतर होईल; प्रेम मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
मालिनी काव्याला विचारणार ‘तो’ प्रश्न
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, काव्या तिच्या सासूला म्हणजेच मालिनीला दागिने काढून देत असते. शेवटी ती मंगळसूत्रदेखील काढत असते. तितक्यात मालिनी म्हणते, “मंगळसूत्र काढायची इतकी घाई? लग्नानंतरचं मंगळसूत्र टिकवायला लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या. तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि ते लग्नानंतरही सुरू आहे. बरोबर ना काव्या?”, मालिनीचे ते शब्द ऐकून काव्याला धक्का बसतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, लग्नानंतरचं मंगळसूत्र टिकवायला लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा ट्रॅक पाहायला उत्सुक असल्याचे म्हटले आहे. “काव्या”, “या ट्रॅकची वाट पाहत आहे. या ट्रॅकनंतर काव्या व पार्थ यांचा प्रवास सुरू होईल. हे पाहण्यासाठी उत्सुक आहे”, “हे काव्याचं स्वप्न असेल, अशी आशा आहे आणि खरं असेल तर काहीतरी चांगलं दाखवा”, “काव्या व पार्थचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, काव्या व जीवाचे एकमेकांवर प्रेम होते, हे समजल्यानंतर नंदिनी व पार्थ यांचा निर्णय काय असणार, घरच्यांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.