Lagnanantar Hoilch Prem Fame Actress Shared Her Struggle Story : कलाकार म्हटलं की, संघर्ष आलाच. प्रत्येक जण मेहनत करून पुढे आलेला असतो. अशातच छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही तिच्या संघर्ष काळाबद्दलची माहिती दिली आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’फेम या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या काळात करावा लागलेला संघर्ष स्पष्ट केला आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्रीनं तिच्या संघर्षाबद्दलची माहिती दिली आहे. कश्मिरानं ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिला “सांगली ते मंबई हा तुझा प्रवास कसा होता” याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर कश्मिरा म्हणाली, “हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. सांगलीतून मी आधी पुण्यात आले. पुण्यामध्ये नाटकाचे बरेच प्रयोग केले होते”.
कश्मिरा पुढे म्हणाली, “मला प्रत्येक वेळी जे काम मिळत गेलं, त्यामागे प्रत्येक वेळी एक वेगळी गोष्ट आहे. मी ‘बालगंधर्व’च्या येथे मैत्रिणीबरोबर नुसतं जाऊन बसायचे. माझी मैत्रीण होती. त्यांच्या नाटकाचे प्रयोग होते आणि त्या नाटकात एक भूमिका साकारणारी मुलगी एक दिवस अचानक गायब झाली. आणि कळलं की, आता ती परत येऊ शकत नाही. तेव्हा त्या नाटकाच्या दिग्दर्शकांनी तुम्ही हे रोज बघत आहात ना; मग तुम्ही या नाटकात ती भूमिका कराल का, असं विचारलं”.
कश्मिरा याबाबत पुढे म्हणाली, “त्यांनी सांगितलेलं की, श्रीराम लागू आणि इतर काही प्रसिद्ध कलाकार येणार आहेत हा प्रयोग बघायला. तेव्हा मी रात्रभर जागून त्याची तयारी केली आणि प्रयोगानंतर मला श्रीराम लागू यांनी फूल देऊन छान काम केलंस तू बाळा, असं सांगितलं. तिथेच त्या दिवशी सुनीता नावाची एक मुलगी आली होती, जी कास्टिंग करायची. ती मला म्हणाली की, मी ‘चार दिवस सासूचे’साठी खूप दिवस झाले. बऱ्याच मुलींना पाठवतेय. चार ते पाच दिवसांचाच रोल आहे; पण काही होत नाहीये. त्यांना तुझ्यासारखीच मोठ्या डोळ्यांची आणि साधी, गोड अशी मुलगी हवीये. तू जाशील का?”
कश्मिरा पुढे म्हणाली, “मी माझा नंबर दिल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी फोन आला आणि मग मी मुंबईला आले होते. तेव्हा माझ्याकडे फार काही नव्हतं; पण आईनं बनवलेली एक चेन होती गळ्यामध्ये. ती चेन विकून मी गरजेच्या काही वस्तू खरेदी केल्या आणि एका टेम्पोत बसून मुंबईला आले, ७ जूनला मी आले होते. खूप पाऊस होता त्यावेळी. तेव्हा मी अंधेरीत होते आणि कोणाच्या तरी ओळखीनं माझी म्हाडाच्या ऑफिसमध्ये राहण्याची सोय झाली होती. कारण- माझं बजेट जास्त नव्हतं; पण तिथे दोन दिवस काम सुरू असल्यानं ते म्हणाले की, दोन दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल”.
“दोन दिवस मी अंधेरीच्या पार्किंगमध्ये राहिले आणि तिथूनच ऑडिशनलाही गेले. त्यावेळी मी सांगलीची असल्यानं माझ्या भाषेचा लहेजा वेगळा होता. घाटी भाषा बोलायचे मी; पण नंतर मालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर रोहिणी हट्टंगडी ताईंमुळे माझ्या भाषेत सुधारणा झाली. ‘चार दिवस सासूचे’मधील तो रोल प्रेक्षकांना इतका आवडला की, मी तो तीन वर्षं केला. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हे काही कायमचं काम नाहीये. कधीही ते बंद होऊ शकतं. त्या वेळची सर्वाधिक काळ चालणारी मालिका होती ती. पण कधीही बंद होईल, असं वाटायचं; मग पुढे काय करायचं आपण, हा प्रश्न पडायचा”.
दरम्यान, कश्मिराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून रम्याची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिनं ‘काव्यांजली’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अभिनेत्री नुकतीच ‘वामा’ या चित्रपटातून झळकली होती.