Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar : विजय आंदळकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. विजयने आजवर अनेक मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच विजयने नुकतच एका मुलाखतीमध्ये त्याच्या भाषेमुळे बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी हुकल्याबद्दलची माहिती दिली आहे.
विजय सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यामधील त्याच्या भूमिकेने अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विजयने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी कशी हुकली ते स्पष्ट केलं आहे.
विजयसह यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मित्रही मुलाखत देताना दिसला. त्यामध्ये विजयचा मित्र म्हणाला, “त्यानं एकदा हिंदी नाटकात काम केलं होतं. त्यावेळी त्यानं कमाल सादरीकरण केलं होतं. माझा विश्वास बसला नाही की, तो हाच आहे.” विजय पुढे म्हणाला, “याचे दुष्परिणामही आहेत. ते उर्दू हिंदी नाटक होतं. तेव्हा माझं उर्दू हिंदी जबदरदस्त झालं होतं. एक फिल्म आली होती, डॅडी नावाची ज्यामध्ये अर्जुन रामपाल आहे.
बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी हुकली
“मी त्या फिल्मच्या ऑडिशनला गेलो होतो. त्यांना हिंदीमध्ये मराठी उच्चार असणारा म्हणजेच मराठी भाषक कशी हिंदी बोलेल, तर अर्थात त्यात थोडा त्याचा मराठी लहेजा येणारच. तसं अपेक्षित होतं. पण तो मला येईचना. कारण- माझं उर्दू हिंदी झालं होतं त्याच्यातनं तो रोल गेला. असे दुष्परिणामसुद्धा होतात”.
विजयने ‘ढोल ताशा’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अभिनय क्षेत्रात प्रयत्न करूनही चांगलं काही मिळत नसल्याने त्याने या क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारी अधिकारी व्हायचे ठरवले होते. परंतु, त्यादरम्यान त्याला ‘ढोल ताशा’ चित्रपटाची ऑफर आली आणि त्यानंतर तो या क्षेत्रात काम करू लागला. याबाबत विजयने मागे एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.
दरम्यान, सध्या विजय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ देशमुख ही भूमिका साकारत आहे. त्यामधील त्याची व ज्ञानदा रामतीर्थकरची जोडी प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. त्यामध्ये त्यांच्यासह विवेक सांगळे व मृणाल दुसानीसही महत्त्वाच्या भूमिकेतून पाहायला मिळतात.