Lakhat Ek Aamcha Dada Fame Disha Pardeshi’s New Project : दिशा परदेशी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. त्यामध्ये तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. अशातच आता अभिनेत्री एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिने याबाबत सोशल मीडियावरून फोटो शेअर केला आहे.
दिशा काही दिवस परदेशात असल्याचं तिच्या सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओमधून पाहायला मिळालं होतं. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामार्फत ती तिचे रील, फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच आता तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
दिशा परदेशीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण?
दिशाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने ‘गणपती बाप्पा मोरया’ असं लिहिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात असलेल्या क्लॅपवर (Clap) निर्मितीच्या पुढे दिशा परदेशी असं तिचं नाव लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे आता अभिनेत्री एका नवीन कलाकृतीची निर्मिती करणार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आजवर तिनं मालिका व चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, आता ती निर्मितीसुद्धा करणार असल्याचा अंदाजाS तिनं शेअर केलेला फोटो पाहिल्यानंतर येतो.

दिशा परदेशीचं नुकतंच ‘बरस पावसा बेधुंद’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. याआधी ती ‘झी मराठी’वरील ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये झळकली होती. ही तिची पहिलीच मालिका होती. परंतु, पहिल्या मालिकेतूनच तिनं अनेकांची पसंती मिळवली. त्यामुळे दिशाचा आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
दिशानं ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिनं ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिनं तिच्या प्रकृतीच्या कारणांमुळे मालिका सोडली असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यासह तिनं ती लवकरच काही नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, दिशानं या मालिकेपूर्वी ‘प्रेम पहिलं वहिलं’, ‘मन फकिरा’ या चित्रपटांत काम केलं होतं. ‘प्रेम पहिलं वहिलं’मध्ये तिच्यासह अभिनेता संजय सेजवाल झळकला होता; तर ‘मन फकिरा’मध्ये ती अभिनेत्री पूजा सावंत, पुष्कर जोग या कलाकारांसह झळकली होती. पुष्कर जोगनंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.