Disha Pardeshi New Project : ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे दिशा परदेशी. दिशानं या मालिकेत तुळजा हे पात्र साकारलं होतं. यामधील तिच्या कामातून तिनं अनेकांची पसंती मिळवली. परंतु, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं मालिकेतून काही कारणांमुळे एक्झिट घेतली. अशात आता अभिनेत्री लवकरच एक नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्री कोणत्या नवीन कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अशातच आता ती लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, यावेळी ती कुठल्या मालिकेतून नायिका म्हणून नाही, तर निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिशा निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत असून, तिची ही आगामी कलाकृती ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.
दिशा परदेशीची निर्मिती असलेल्या कलाकृतीत झळकणार ‘हे’ कलाकार
दिशाची निर्मिती असलेल्या आगामी कलाकृतीतून मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकार झळकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’वरील मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेले कलाकार दिशा परदेशी व आरुष राजे यांची निर्मिती असलेल्या आगामी ‘वर वरचे स्वयंवर’ या कलाकृतीतून झळकणार आहेत. त्यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम शीतल क्षीरसागर, ‘सारे काही तिच्यासाठी’ फेम दक्षता जोईल, ‘३६ गुणी जोडी’ फेम आयुष, संजीव हे कलाकार झळकणार असल्याचे सोशल मीडियावरील फोटोंमधून पाहायला मिळत आहे.’

दिशा परदेशी व आरुष राजे यांची ‘वर वरचे स्वयंवर’ ही कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, ही वेब सीरिज असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांची हजेरी लागल्यामुळे यामध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे पाहणे रंजक ठरेल.
दिशाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती दिली होती. त्यावेळी तिने कलाकृतीचे नावही सांगितले होते. आता नुकतेच यामध्ये कोणते कलाकार असणार हेही समोर आले आहे. परंतु, तिची आगामी कलाकृती कधी प्रदर्शित होणार याबाबत अजून अभिनेत्रीने काही खुलासा केलेला नाही.