‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये शत्रू तेजश्रीला सर्वांसमोर तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ त्याचं नसल्याचं सांगतो. मंदिरामध्ये सर्वांसमोर तो तेजश्रीवर आरोप करत संशय घेतो, यामुळे सूर्या व त्याच्यामध्ये वाद होताना पाहायला मिळतं.
शत्रूने तेजश्रीच्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर तेजू तिच्यावर झालेले आरोप खोट आहेत हे सिद्ध करण्यासाठी पर्डी परीक्षा देण्यास तयार होते, असा काहीसा सीन समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळतोय. पर्डी परीक्षेच्या सीनसाठी तेजू व शत्रूला नदीतील पाण्यात जाऊन बांबू राफ्टवर बसून समतोल राखायचा असतो. परंतु, हा परीक्षेचा सीन इतर सीनच्या तुलनेत चित्रीकरणाच्या दृष्टीने कठीण आहे. अशातच मालिकेत तेजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल मोरेने या सीनच्या पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने यामध्ये हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला याबाबत सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तेजू व शत्रू परीक्षा देतात तो सीन कसा चित्रीत करण्यात आला हे पाहायला मिळतं.
कोमलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती व शत्रू नदीजवळ बांबू राफ्टवर बसून ही परीक्षा देतानाच्या सीनचं चित्रीकरण करत असतात. यावेळी त्यांना खरोखर पाण्यात जाऊन हा सीन करायचा होता, त्यामुळे थोडा जरी तोल गेला तरी पाण्यत पडल्याने पूर्ण लूक खराब होण्याची शक्यता होती, शिवाय यामुळे त्यांना दुखापतही होऊ शकत होती. परंतु, तरीसुद्धा त्यांनी व सेटवरील इतर मंडळींनी धीराने, सर्जनशीलतेने या सीनचं चित्रीकरण पूर्ण केलं. इतर सीनच्या तुलनेत हा सीन चित्रीत करण्यासाठी कठीण आहे. याबाबत कोमलने कॅप्शनमध्येही सांगितलं आहे.
कोमलने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “उत्तम शॉट्स सहज मिळत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि चांगल्या शॉट्ससाठी कधीकधी नदीच्या मध्यभागी जाऊनही शूट करावं लागतं. या शॉटने आम्हाला मानसिक, शारीरिक आणि सर्जनशीलतेचे महत्त्व पटवून दिले. या सर्व परिस्थितीत खंबीरपणे उभे राहिलेल्या क्रूला सलाम.”
दरम्यान, अभिनेत्री कोमल मोरे हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत तेजश्रीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती सकारात्मक भूमिकेत झळकत आहे. यापूर्वी ती ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.