‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेतील सूर्याच्या आयुष्यात सतत काही ना काही घडताना दिसते. कधी डॅडी व शत्रू त्याच्याविरूद्ध कट-कारस्थान करताना दिसतात, तर कधी तुळजा व त्याच्यात गैरसमज होताना दिसतात. काही वेळेस बहि‍णींसाठी तो चिंतेत असतो. सूर्याची आई लहानपणीच त्यांना सोडून निघून गेली, तेव्हा त्यांच्या कुटुंबाला समाजाकडून अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या. सूर्याच्या वडिलांना मद्याचे व्यसन लागले, त्यामुळे घराची जबाबदारी सूर्यावर येऊन पडली. सूर्याने त्याच्या लहान चार बहि‍णींबरोबरच त्याच्या वडिलांचीदेखील जबाबदारी घेतली. बहि‍णींना त्याने प्रेमाने वाढवले. आता मात्र त्यांच्या घरात एक महिला आल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. या महिलेला पाहताच सूर्याचा संताप अनावर झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आमचा तुझ्याशी काही संबंध नाही…

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्याच्या घरात एक महिला आली आहे. तिला पाहताच सूर्या रागाने म्हणतो, “का आलीस तू इथं? कोणी बोलावलं तुला इथं? एवढ्या वर्षांनंतर तुला या घराची आठवण आली का?”, सूर्याचे हे बोलणे ऐकून ती महिला रडत म्हणते, “माफ कर, चुकलं माझं.” त्यानंतर सूर्या म्हणतो, “तुझी वाट बघून थकलो गं. आता एकटी पडल्यानंतर तुला आमची आठवण आली का? मनाला वाटलं तेव्हा घर सोडून जायचं, मनाला वाटलं तेव्हा घरात यायचं. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाही, आमचा तुझ्याशी काही संबंध नाही, जा इथून.” सूर्या व या महिलेच्या संभाषणादरम्यान राजश्री, धनश्री व सूर्याचे वडील म्हणजेच तात्या रडताना दिसत आहेत, तर तुळजाच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या दादाच्या घरी आलेल्या या महिलेची भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी साकारत आहेत. या मालिकेत त्यांनी सूर्याची काकी हे पात्र साकारले आहे. आता सूर्याचा त्याच्या काकीवर का राग आहे, तो त्यांना परत जायला सांगणार की माफ करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पुष्पा काकीच्या परत येण्याने सूर्या व तुळजाच्या आयुष्यात काही बदल होणार का हे पाहणे मह्त्त्वाचे ठरणार आहे.