Amruta Deshmukh and Siddharth Khirid dance on Nepali song: पडद्यावर दिसणारे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सोशल मीडियावर या कलाकारांनी शेअर केलेले फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेतात.
चाहतेदेखील त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्टना प्रतिसाद देताना दिसतात. तसेच कमेंट्स करीत त्यांचे कौतुकही करताना दिसतात.
अमृता देशमुख आणि सिद्धार्थ खिरीडचा नेपाळी गाण्यावर डान्स
आता अभिनेत्री अमृता देशमुख आणि सिद्धार्थ खिरीड यांचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकार डान्स करताना दिसत आहेत. फेरी जालमा या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. हे गाणे नेपाळी भाषेतील आहे. दोघांच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव यांमुळे त्या कलाकारांचे कौतुक होताना दिसत आहे.
अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना २५ वेळा शॉट घेतल्यानंतर वन शॉट ओके, अशी कॅप्शन दिली आहे. कलाकारांच्या या व्हिडीओवर कमेंट करीत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, अमृताचा पती अभिनेता प्रसाद जवादेनेदेखील कमेंट केली आहे. त्याने सिद्धार्थला टॅग करीत लिहिले की, मला असं वाटतंय तू ५ च्या ऐवजी ७ काउंट केलं आहेस. त्यावर सिद्धार्थने त्यावर उत्तर देत लिहिले की, तुझी बायको चांगली दिसावी म्हणून चुकलो. त्यावर प्रसादने लिहिले, थँक्यू, तू खूप चांगला आहेस.
तर चाहत्यांनी कमेंट्स करीत लिहिले, “कडक डान्स. दोघेसुद्धा भारी नाचले. पण, अमृता तू खूप छान डान्स केलास”, “तुम्हा दोघांच्या एकत्र डान्सची मी खूप दिवसांपासून वाट बघत होतो”, “वाह! छान”, “फ्रेशर्स”, “खूप दिवसानंतर यांची जोडी भेटीला आली”, “परी आणि नीरव”, अशा अनेक कमेंटस् केल्या आहेत.




सिद्धार्थ खिरीड आणि अमृता झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत एकत्र काम करताना दिसले होते. २०१६ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अमृताने परी देशमुख हे पात्र साकारले होते; तर सिद्धार्थने नीरव हे पात्र साकारले होते. या दोघांबरोबरच रसिका वेंगुर्लेकर, ओंकार राऊत, रश्मी अनपट, मिताली मयेकर, शुभंकर तावडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. कॉलेजमधील तरुणाईवर आधारित ही मालिका होती. त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते.
सध्या अमृता देशमुख झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहे; तर सिद्धार्थ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत काम करीत आहे. या दोन्ही मालिकांचा चाहतावर्ग मोठा आहे.