Meghan Jadhav & Anushka Pimputkar Wedding : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आज ( १६ नोव्हेंबर ) लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मी निवास’च्या टीमने या दोघांचं थाटामाटात केळवण केलं होतं. आता ‘अनुमेघ’ ( अनुष्का व मेघन ) आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत. यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो नुकताच समोर आला आहे.

अनुष्का व मेघन या दोघांनीही लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केला होता. अनुष्का गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत खूपच सुंदर दिसत होती. सुंदर साडी, गळ्यात सुंदर हार, हातात मॅचिंग बांगड्या, नाकात नथ असा लूक अनुष्काने केला होता. तर, मेघनने लग्नसोहळ्यात शेरवानी घातल्याचं पाहायला मिळत आहे.

अनुष्का व मेघन यांची भेट ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि वर्षभराने मेघनने त्यांच्या नात्याविषयी घरी सांगितलं होतं. हर्षदा खानविलकर या दोघांविषयी म्हणतात, “हा माझा जावई आहे…आमच्या शोमध्ये ( रंग माझा वेगळा ) हा आमचा जावई होता. ‘रंग माझा वेगळा’मध्ये हे दोघं भेटले, मैत्री झाली आणि तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की असं काही असेल. शो संपताना आमच्या लक्षात आलं की ओह…असं काहीतरी आहे. आज मला या दोघांसाठी खूप-खूप छान वाटतंय.”

मेघन व अनुष्का गेली अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आहे.

meghan
मेघन जाधव व अनुष्का पिंपुटकर

मेघन व अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. तर, अनुष्का पिंपुटकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नंदिनी-काव्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारत आहे.