Meghan Jadhav Haldi Ceremony : मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘लक्ष्मी निवास’ फेम जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा लग्नसोहळा आज ( १६ नोव्हेंबर ) थाटामाटात पार पडणार असून, अभिनेत्याच्या घरी शनिवारी रात्री हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याची खास झलक त्याच्या भावाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

मेघन जाधव अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांची ओळख ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आता मेघन-अनुष्का आयुष्याचे जोडीदार होणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या संपूर्ण टीमने या दोघांच्या केळवणासाठी खास तयारी केली होती. याशिवाय १४ नोव्हेंबरला पार पडलेल्या अनुष्काच्या मेहंदी सोहळ्याला मेघनसह अभिनेत्री हर्षदा खानविलकर सुद्धा पोहोचल्या होत्या.

आता मेघन जाधवचा सख्खा भाऊ अभिनेता मंदार जाधवने सोशल मीडियावर भावाच्या हळदी समारंभाची झलक शेअर केली आहे. “मेघनची हळद…” असं कॅप्शन मंदारने या व्हिडीओला दिलं आहे. मंदार जाधव सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. यापूर्वी मंदारने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

मंदारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या संपूर्ण जाधव कुटुंबाची झलक पाहायला मिळतेय. याशिवाय नवरदेव मेघनच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या गेल्याचं देखील दिसतंय. या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आता मेघन-अनुष्काच्या लग्नाला कोणकोणते कलाकार उपस्थित राहणार? दोघांचा लग्नातील पारंपरिक लूक कसा असेल याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, मेघन सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. तर, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या-नंदिनीच्या लहान बहिणीच्या भूमिकेत झळकत आहे.