Lakshmi Niwas fame Tushar Dalvi praises Harshada Khanvilkar: ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मी आणि श्रीनिवास हे त्यांच्या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्यासाठी, स्वत:ची मोजकीच; पण महत्त्वाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

घरातील प्रेमळ आणि बरोबर असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या कायम पाठीशी असणारे आणि चुकणाऱ्यांना शिक्षा देणारे, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी विविध युक्त्या करणारे लक्ष्मी आणि श्रीनिवास सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. या मालिकेत लक्ष्मी ही भूमिका हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे. तर, श्रीनिवास या भूमिकेत अभिनेते तुषार दळवी दिसत आहेत.

तुषार दळवींनी सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव

अभिनेते तुषार दळवी यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सहकलाकार हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

तुषार दळवी म्हणाले, “हर्षदा या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून काम करीत आहे. खूप वर्षांपासून मीदेखील या अभिनय क्षेत्रात काम करतोय. पण, आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहोत. याआधी आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही.

जेव्हा एखाद्या कलाकाराबरोबर एकत्र काम करण्यास सुरुवात होते. त्यावेळी सुरुवातीचे काही दिवस जावे लागतात. असंही होतं की, तिनंही इतकं काम केलेलं आहे, मीदेखील इतकं काम केलेलं आहे आणि त्यामुळे सुरुवातीला असं वाटतं की कशी असेल, काय बोलेल, काय होईल. तिलाही वाटत असेल की, हा आता कसा काय रिअॅक्ट होईल किंवा कम्फर्ट असेल. पण, आम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केल्यानंतर आम्हाला एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी अजिबात प्रयत्न करावे लागले नाहीत. ते सहज झालं.

हर्षदा खानविलकर यांचे कौतुक करीत तुषार दळवी पुढे म्हणाले, “त्याचं सगळ्यात जास्त श्रेय हर्षदाला द्यायला पाहिजे. कारण- ती खूप चांगली आहे. खूप छान आहे. सेटवर कोणाला काहीही झालं तरी तिला खूप काळजी असते. तिला कोणीही काहीही सांगितलं तरी ती स्वत:ची समस्या आहे, असं समजून प्रयत्न करते. ती फक्त स्वत:चाच विचार करत नाही. ती सगळ्यांचा विचार करते. ती उत्तम अभिनेत्री तर आहेच.”

अभिनेते पुढे म्हणाले, “आम्हाला एकमेकांप्रति आणि कामाप्रति आदर आहे. तिनं याआधीही खूप छान काम केलेलं आहे. त्यामुळे आमची मैत्री सहज झाली, असं मला वाटतं. नशिबानं ही मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माझी अशी इच्छा आहे की, ही मैत्री कायम राहावी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या आयुष्यात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.