Lakshmi Niwas Serial Fame Actress Post : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या शोचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा पहिला सीझन चांगलाच गाजला. तब्बल दहा वर्षे या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या शोमधील कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे या कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.

या कलाकारांबरोबरच या शोचा संगीत संयोजक तुषार देवलसुद्धा प्रसिद्धी झोतात आला. काही स्किट्समध्ये छोट्या भूमिकांमध्ये तुषार पाहायला मिळतो. अशातच आज (११ ऑगस्ट) तुषारचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मंडळी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत.

अशातच तुषारची पत्नी आणि अभिनेत्री स्वाती देवलनेही नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. तुषारबरोबरचा एक खास फोटो शेअर करत ती या पोस्टमध्ये असं म्हणते, “तुझं आणि माझं असं एक विश्व आपण दोघांनी उभ केलं आहे. एक छोटसं घरटं. त्यात एक पिल्लू आहे. कधीतरी ते ही मोठं होऊन भुर्रकन उडून जाईल, पण तुला मी आणि मला तू असेच राहणार आहोत; त्याचं जगही मिळून पाहू…”

यानंतर स्वाती म्हणते, “तुझ्या नजरेतून तू एक जादूचं जग मला दाखवलंस. ते प्रत्यक्षात उभं करायला काय आणि किती कष्ट घेतले ते आपणच जाणू. अजूनही खूप स्वप्न पाहिली आहेस, आपण मिळून ती पूर्ण करू असं वचन मी तुला तुझ्या वाढदिवशी देते. तुला खूप पुढे जायचंय. मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि संकटात नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुला तर माहीतच आहे, ही ‘तुषारी’ तुषारशिवाय कोणीच नाही. अशीच साथ देत राहू.”

यापुढे स्वाती नवऱ्याच्या प्रकृतीबद्दल असं म्हणते, “अचानक स्ट्रेस घेऊन मध्येच आजारी पडून धक्का दिलास; त्यामुळे आता तर मी माझी तुझ्या हाताची पकड एकदम घट्ट केलीय. तुला चांगलं आरोग्य, उत्तम अखंड आयुष्य लाभो आणि तुला जगातलं सगळं चांगलच मिळो… चांगली माणसे, चांगली कामे, भरपूर यश… असं सगळं मिळो. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!”

स्वाती देवल इन्स्टाग्राम पोस्ट

स्वातीने शेअर केलेल्या या पोस्टवरही अनेक कलाकार मंडळींनी तुषारला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, स्वातीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मोठ्या मुलीची म्हणजेच ‘मंगला’ ही भूमिका अभिनेत्री स्वाती देवल साकारत आहे. या मालिकेबरोबरच स्वाती देवल ‘कलर्स’ हिंदी वाहिनीवरील ‘मनपसंद की शादी’ या मालिकेतही झळकणार आहे.