Lakshmichya Pavalani fame actor propose his girlfriend: आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. कलाकारदेखील सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
अनेकदा हे कलाकार रील्स आणि विनोद याद्वारेदेखील चाहत्यांच्या भेटीला येतात. आता अशाच एका कलाकाराने त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका दिवसेंदिवस गाजत आहे. अद्वैत चांदेकर आणि कला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळते. वेगवेगळे स्वभाव व सवयी असलेले कला व अद्वैत हे एकमेकांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असल्याचे दिसते. पण, संकटात दोघेही एकमेकांच्या मदतीला धावून जातात. मालिकेत अभिनेता अक्षर कोठारीने अद्वैत ही भूमिका साकारली आहे; तर ईशा केसकरने कला ही भूमिका साकारली आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला केले प्रपोज
काही दिवसांपूर्वीच अक्षर कोठारीने लग्नगाठ बांधली. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत सोहम चांदेकर ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ऋत्विक तळवलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्याच्या नात्याबद्दल सांगितले आहे.
ऋत्विकने सोशल मीडियावर त्याच्या गर्लफ्रेंडसह काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंनुसार अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचे दिसत आहे. आता हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले, “४ वर्षांचं रिलेशनशिप, ३ वर्षे लाँग डिस्टन्स, आयुष्यातील २८ वर्षं मी या दिवसाची वाट पाहिली आहे आणि आता तू माझी आहेस”
हे फोटो शेअर करताना त्याने त्याच्या गर्लफ्रेंडलादेखील टॅग केले आहे. अनुष्का चंदक, असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. ती क्लासिकल डान्सर असल्याचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसत आहे. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.
काही दिवसांपूर्वींच अभिनेत्याने त्यांच्या नात्याला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही जुने फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता.
आता अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अक्षर कोठारीने लिहिले की, ऋत्विक व अनुष्का अभिनंदन! हे बघून खूप आनंद झाला. तुम्हाला खूप प्रेम, असे म्हणत अभिनेत्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, दीपाली पानसरे, अभिषेक रहाळकर यांनीदेखील ऋत्विकच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.