Abhidnya Bhave’s Husband Post On Lalbaugcha Raja Mismanagement : देशभरासह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला. दहा दिवस गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला साश्रू नयनांनी निरोपही दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जन प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाली.
३६ तास रखडल्यानंतर, लालबागच्या राज्याचं विसर्जन रविवारी रात्री ९ च्या दरम्यान पार पडले. समुद्रातील भरतीमुळे गणेशमूर्ती तराफ्यावर न नेता आल्यानं विलंब झाला आणि अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या रखडलेल्या विसर्जनाबद्दल सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच मंडळाच्या व्यवस्थापनाबद्दल टीका केली जात आहे. अभिनेत्री आरती सोळंकीने या विसर्जनाबद्दलची पोस्ट शेअर केली होती.
अशातच आता अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पै याने लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवूकीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला झालेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मंडळाच्या भक्तांबरोबरच्या वागणुकीवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
या पोस्टमध्ये मेहुल असं म्हणतो, “लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता. इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा… एका बाजूला व्हीआयपी लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान… हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्यावरचं आरसपानी प्रतिबिंब दिसलं. इतकंच नाही, तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमानही करण्यात आला.”
यानंतर तो म्हणतो, “पण राजा तो राजा असतो आणि तो सर्वांचा असतो. अनंत चतुर्दशीला हे अगदी स्पष्ट झालं. जेव्हा राजा अधांतरी पाण्यात विसर्जनासाठी उभा होता, तेव्हा त्याच्या शेजारी त्याच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते नव्हते; तर कोळी बांधव तब्बल १२ तास त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे होते. शेवटी रात्री १० वाजता कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि राजा आपल्या गावी परत गेला. मात्र, राजा पाण्यात पाठ फिरवून उभा असतानाचं जे दृश्य डोळ्यांना दिसलं, ते मनाला पिळवटून टाकणारं आणि अतिशय वेदनादायी होतं.”

यानंतर मेहुलने म्हटलंय, “आता तरी या मंडळाने समजून घ्यायला हवं की, भेदभाव हा भक्तीचा भाग नसतो आणि यातून हा धडा घ्यावा की, आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे, त्यामुळे कर्माची फळ लगेच परत मिळतात. लालबागच्या राजाचा विजय असो.” दरम्यान, मेहुलची ही स्टोरी अभिज्ञानेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.