Lapandav Fame Chetan Vadnere Talks About Satish Rajwade :अभिनेता चेतन वडनेरे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता लवकरच अभिनेता एका नव्या मालिकेतून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच त्याने मालिकेच्या प्रमोशनदरम्यान एक जुनी आठवण सांगितली आहे.

चेतन लवकरच ‘स्टार प्रवाह’वरील ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून त्याची ही मालिका सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील सर्व कलाकार प्रमोशननिमित्त एकत्र जमले होते. त्यावेळी चेतनने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे सर्वेसर्वा सतीश राजवाडे यांच्याबरोबरची एक खास आठवण सांगितली आहे.

चेतन लवकरच ‘लपंडाव’ या मालिकेतून कान्हा या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी तो याच वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून झळकलेला. याच मालिकेमुळे तो नायक म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. अशातच आता नवीन मालिकेचं प्रमोशन करत असताना त्याने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबरचा किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

चेतन वडनेरेने सांगितली १५ वर्षांपूर्वीची ‘ती’ आठवण

‘टेली गप्पा’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चेतन सतीश यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. चेतन जुनी आठवण सांगत म्हणाला, “२००९ साली ‘गैर’ नावाचा चित्रपट आला होता. सतीश सरांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं. त्याच्या प्रमोशनदरम्यान ते नाशिकमध्ये आमच्या कॉलेजमध्ये आलेले आणि सगळे जण अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते. मी नुकतीच नाटकांमधून काम करायला सुरुवात केलेली. मी तिथे सतीश सरांसाठी गेलेलो.”

चेतन गंमत करत पुढे म्हणाला, “त्यांची नजर जर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील एक मिनिट माझ्या चित्रपटात काम करशील? असं मला वाटलं होतं. पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं त्यामुळे खूप गर्दी झाली आणि त्या गर्दीत मी दिसलोच नाही. पण संध्याकाळी त्याचं प्रिमियर होतं नाशिकमध्येच तर प्रिमियरकरता मी पण गेलो होतो. पण तिकीट मिळाले नाही तेव्हा शो हाऊसफुल होता. त्या गर्दीत सतीश सरांशी बोलणं वगैरे या गोष्टी शक्यच नव्हत्या. म्हणून मी आणि माझा मित्र निराश झालो आणि आम्ही तिकडनं निघालो तर पुढे सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते बाकी कोणीच नव्हतं तिथे.”

चतेनने पुढे सांगितलं, “सगळे लोक आतमध्ये चित्रपट पाहत होते म्हटलं आता यांची नजर माझ्यावर पडणार म्हणजे पडणार. ते बघताच क्षणी विचारतील एक मिनिट काम करशील माझ्या चित्रपटात? पण गंमत अशी झाली मी गेलो त्यांना भेटलो आणि म्हणालो सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होतात. पण तुमची भेट नाही झाली. मला काही तिकीटं मिळाली नाही. तर ते म्हणाले हरकत नाही मित्रा उद्या ये आणि चित्रपट बघ. त्यांच्या नजरेत शोधत होतो की, आता थांब वगैरे म्हणतील.. पण त्यांच्या नजरेत मला हेच दिसलं की, निघू शकतोस आता. हे मी त्यांच्या डोळ्यात वाचलं आणि मी निघालो. त्यानंतर त्या गोष्टीला आता जवळपास झालेत १२-१५ वर्षं काहीतरी. त्या गेल्या १२-१५ वर्षांपासून जो काय लपंडाव मी खेळलो त्यातनं आता मी नशीबवान ठरलो की त्यांच्याबरोबर एक स्टेज शेअर करत आहे. असं सगळं जुळून आलंय. धन्यवाद सर.”