Lapandav Upcoming Twist: ‘लपंडाव’ ही मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सरकार, सखी आणि कान्हा ही पात्रे दिसत आहेत. सखी ही तिच्या आईने तिच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत यासाठी आसुसलेली आहे. आईने तिला मायेने जवळ घ्यावे, तिच्याशी चांगले वागावे, अशी तिची इच्छा आहे.
सखीची जरी अशी इच्छा असली तरीही तिला आईच्या प्रेमापासून वंचित राहावे लागत आहे, कारण तिची आई तिला आई म्हणू देत नाही. ती तिला सरकार म्हणायला लावते. तिच्याशी कठोरपणे वागते. सरकारला तिच्या मनाविरुद्ध काहीही झालेलं आवडत नाही; तर कान्हा हा गरीब वस्तीतला मुलगा आहे. आता या गोष्टीत पुढे काय होणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असल्याचे दिसते.
“सखीचे लग्न करून देण्यात…”
आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लपंडाव या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सरकारच्या घरी बैठक बसली आहे. त्यामध्ये वकीलदेखील आहेत. ते इच्छापत्र वाचून दाखवत आहेत. ते म्हणतात की, राघव कामत यांच्या इच्छापत्रानुसार वय वर्षे २० पूर्ण केल्यानंतर वर्षाच्या आत सखीचे लग्न करून देण्यात यावं, नाहीतर कामतांची सर्व संपत्ती ट्रस्टला जाईल.
हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सरकार मनातल्या मनात म्हणते, “लग्नच करायचं आहे ना, अशा मुलाशी करेन जो फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचेल. सखी म्हणते की मी लग्नासाठी अजून तयार नाही. सरकार म्हणते, “तुला आता लग्न करावचं लागेल.” पुढे सरकार मनातल्या मनात म्हणते की, पण असा मुलगा कोण असेल? तितक्यात दरवाजात कान्हा उभा राहून सरकारला आवाज देतो, मी आलोय मॅडम, असे तो म्हणतो.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने सरकारला मिळेल का त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारा जावई? अशी कॅप्शन दिली आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार, सखी व कान्हाच्या आयुष्यात सरकारमुळे काय बदल घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारची कोणती गुपिते सर्वांसमोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.