Laxmi Niwas Fame Akshaya Deodhar Talk’s About Harshada Khanvilkar : ‘लक्ष्मी निवास’ ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये कलाकारांची मोठी फौज आहे. मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं. त्यामध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर मुख्य भूमिका साकारत आहेत. अशातच मालिकेतील अभिनेत्री अक्षय देवधर व कुणाल शुक्ला या ऑनस्क्रीन जोडीनं त्यांच्याबद्दल सांगितलं आहे.
अक्षया व कुणाल या मालिकेत भावना व सिद्धू या भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालिकेत या जोडीचं लग्न पार पडलं. आता त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अशातच दोघांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी मालिकेतील कलाकारांबद्दल सांगितलं आहे.
या मुलाखतीमध्ये अक्षया व कुणाल यांनी हर्षदा खानविलकरबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना “सेटवर दादागिरी कोण करतं” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षयाने “दादागिरी नाही; पण आमच्याकडे बॉस लेडी एकच हर्षदाताई”. त्यावर कुणाल म्हणाला, “त्या ओरडत नाहीत; पण तरीही त्यांचा एक दरारा आहे.”
अक्षया व कुणाल यांना त्यांनी कधी हर्षदा यांचा ओरडा खाल्ला आहे का, असं विचारण्यात आलं. त्यावर अक्षया म्हणाली, “हो ओरडा म्हणजे फार बेसिक गोष्टीवरून त्या बोलतात. कोणी जेवलं नसेल, तर जेवली नाहीस अजून, जेवून घे वगैरे म्हणतात”. पुढे कुणालने, “त्या शांतपणे बोलल्या तरी त्यांचा एक होल्ड असल्याचं जाणवतं, असा करारा स्वभाव आहे त्यांचा”, असे सांगितले.
कुणाल व अक्षया यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे दोघे पहिल्यांदाच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून एकत्र काम करत आहेत. तर कुणालची ही पहिलीच मालिका आहे. परंतु, या मालिकेतील भावना व सिद्धू ही त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका मराठीतील लोकप्रिय मालिका असून, या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. इतर मालिकांपेक्षा ही मालिका यासाठी वेगळी ठरते की, ही मालिका दररोज एक तास प्रसारित होत असते. त्याशिवाय यामध्ये मराठीतील प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळतात. या मालिकेत नेहमी ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात.