Mandar Jadhav Praises Meghan Jadhav : मेघन जाधव मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा आहे. अशातच आता त्याचा मोठा भाऊ अभिनेता मंदार जाधवने नुकतीच त्याच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
गणेशोत्सवनिमित्त मंदार जाधव व मेघन जाधव यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. यानिमित्त त्यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी दोन्ही भावांनी गणेशोत्सवाच्या आठवणीबद्दल सांगितलं आहे. त्यादरम्यान मंदारने मेघनच्या मालिकेबद्दल सांगितलं आहे.
मेघन खऱ्या आयुष्यात जयंतसारखा अजिबात नाहीये – मंदार जाधव
मंदारला मुलाखतीत मेघनच्या कामाबद्दल विचारण्यात आलेलं. यावर तो म्हणाला, “मी त्याला आधी पण सांगितलेलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील त्याची जयंतची भूमिका खूप प्रसिद्ध झाली आहे, पण त्याची भूमिका प्रसिद्ध होण्यामागचं कारण असं आहे की, खऱ्या आयुष्यात त्याचा स्वभाव तसा नाहीये. जयंत कॅमेऱ्यासमोर जे वागतो किंवा जान्हवीशी तो जसा वागतो, मेघन अजिबात तसा नाहीये. मेघन त्याच्या विरुद्ध आहे. तो खूप शांत सयंमी मुलगा आहे, तो खूप हुशार आहे.”
मंदार धाकट्या भावाबद्दल पुढे म्हणाला, “तो खूप कमाल अभिनेता आहे. त्यामुळेच तो जयंतची भूमिका छान पद्धतीने करू शकतोय. त्यामुळे मी त्याला हीच कॉम्प्लिमेंट देइन की, त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तो जे काही काम करत आहे ते खूप कमाल काम करतोय, म्हणूनच ती भूमिका इतकी प्रसिद्ध झाली आणि प्रेक्षकांना आवडतेय.”
मेघन जाधवचं आई व वहिनीने केलं कौतुक
मुलाखतीत पुढे मंदारच्या बायकोला मितीका जाधवलाही तिच्या दीराबद्दल म्हणजेच मेघनच्या कामाबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “जसं की मंदार म्हणाला की, मेघन जयंतसारखा नाहीये आणि तो एक उत्कृष्ट कलाकार आहे.” यावर मंदार पुढे म्हणतो, “आमच्या पूर्ण कुटुंबात झुरळ कोणीच खाल्लं नव्हतं, पण मेघनने ते केलं.”
मेघनबद्दल त्याच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “खऱ्या आयुष्यात तर तो त्याच्या बायकोवर कधी ओरडणारही नाही.” कुटुंबाकडून झालेलं कौतुक पाहून मेघन म्हणाला, “ही मुलाखत पाहिल्यानंतर लोकांना कळेल की मी तसा नाहीये आणि झुरळ खाणं तर लांबची गोष्ट, मी कधी झुरळ मारलेलंही नाहीये.”