Laxmi Niwas Fame Tanvi Kolte Talks About Her Role : ‘लक्ष्मी निवास’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये मराठीतील लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अशातच यातील एका अभिनेत्रीने मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.
लक्ष्मी निवास या मालिकेत अभिनेत्री तन्वी कोलते सिंचना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अशातच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने टीका होण्याची भीती व्यक्त केली आहे. तिने ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली होती. यावेळी तिला तिच्या सिंचना या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते.
तन्वी कोलतेची ‘लक्ष्मी निवास’मधील भूमिकेबद्दल प्रतिक्रिया
मालिकेतील भूमिकेबद्दल ती म्हणाली, “सिंचनाचा रुद्रावतार तिच्या व्यक्तिरेखेतील महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा माझ्या हातात स्क्रिप्ट आली आणि मला कळलं की, मला आईंची (लक्ष्मी) लायकी काढायची आहे वगैरे तेव्हा मी अक्षरश: रडत होते. मी रडत रडत सरांकडे(दिग्दर्शक) गेले आणि म्हटलं की, सर, हे काय आलंय हे मी कसं बोलू भावना आणि लक्ष्मी यांची लायकी का काढू? सिंचना का एवढं बोलेल? मग त्यांनी मला सांगितलं की, एक लक्षात ठेव हे सिंचना बोलतेय; तन्वी बोलत नाहीये.”
अभिनेत्रीने पुढे सांगितले, “मी त्यांना त्यावर म्हटलं की, शेवटी तन्वीलाच बोलायचं आहेत ना हे सगळे संवाद आणि हे ती का बोलेल जेव्हा की लक्ष्मीनंच मला पाठिंबा दिला हरीशनं चोरी केलेली असताना. म्हटलं- सर, मला अजिबात मजा येत नाहीये हे करताना आणि सिंचना माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे.”
तन्वी पुढे मालिकेतील भूमिकेबद्दल म्हणाली, “सिंचना साकारताना मला मजा येत नाहीये; पण काहीतरी नवीन करायला मिळतंय आणि लोकं मला स्वीकारतील या भावनेनं मी अजूनही सिंचना साकारत आहे. मी अशा भूमिका करीत नाही. कारण- मला त्रास होतो. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येतात. त्यामुळे मी आमच्या सरांना सांगितलेलं की, ही सिंचना मी नाही साकारू शकत. तेव्हा सरांनी मला सांगितलं की, जितकं जमतंय, येतंय तेवढं बोलायचं.”
तन्वी कोलतेनं पुढे सांगितलं की, तिला नकारात्मक प्रतिक्रिया आणि टीका होण्याची भीती वाटते आणि तिला अशा प्रकारच्या भूमिका साकारायला आवडत नाही.. ती म्हणाली, “सिंचना सध्या खूप भांडण करत आहे. एक सीन होता- जिथे सिंचना घर सोडून जाते तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास तिला थांबवतात आणि ते दोघे रडत असतात तेव्हा तो सीन कट झाल्यानंतर मी हर्षदाताई व तुषार यांना सॉरी म्हणाले. तेव्हा त्या म्हणाल्या की, एवढं का मनावर घेतेस तू आणि त्या सीननंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझं कौतुक केलं. कारण- मी आधीच सांगून ठेवलेलं की, अशी एवढी रागावणारी भूमिका करायची नाहीये मला.”