Akshar Kothari Wedding : २०२५ या वर्षात मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपल्या लग्नगाठ बांधली. २०२५ या नवीन वर्षात दिव्या पुगांवकर, अभिषेक रहाळकर, निरंजन कुलकर्णी, अक्षय केळकरसह अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. अशातच आता यात आणखी एका मराठी अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. हा अभिनेता म्हणजे अक्षर कोठारी. अक्षरने नुकतीच विवाहगाठ बांधली आहे आणि याचे खास क्षण शेअर केले आहेत.

अक्षरने इन्स्टाग्रामवर पत्नी सारिका खसणीसबरोबरचे लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत “Then, Now and Always” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने ‘बचपन का प्यार’ हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार ‘SaAkshar’ हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे.

अक्षरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने ऑफ व्हाईट रंगाचा सूट आणि तयाची पत्नी सारिकाने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. या फोटोंमध्ये अक्षर आणि सारिका दोघेही आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अक्षरने शेअर केलेल्या फोटोखाली मालिकेतील सहकलाकार तसंच इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अक्षर कोठारी इन्स्टाग्राम पोस्ट

आकाश नलावडे, ईशा केसकर, अपूर्वा नेमळेकर, दीपाली पानसरे, दिव्या पुगांवकर, समृद्धी केळकर, अभिजीत खांडकेकर, ऋतुजा बागवे, गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे यांसह अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्समध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अक्षरच्या अनेक चाहत्यांनीही त्याला अभिनंदन म्हटलं आहे.

अक्षरची पत्नी सारिकाबद्दल सांगायचं झालं तर, ती Scientist असल्याची माहिती आहे. सारिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये Scientist असल्याचं म्हटलं आहे. तर अक्षर कोठारी सध्या स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील त्याची अद्वैत ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्या पडद्यावरील ‘बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर त्याने ‘छोटी मालकीण’, ‘चाहूल २’, ‘स्वाभिमान’ अशा काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अक्षर सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो.