Laxmichya Pavalani Fame Akshar Kothari Talks About Aadesh Bandekar : आदेश बांदेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहेत. आता ते लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये ते झळकणार असून, त्यामधील नायकाने त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
आदेश बांदेकर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील मंगळागौर विशेष या भागात झळकणार आहेत. अशातच नुकतीच त्यांनी या मालिकेतील मुख्य नायक अक्षर कोठारीसह ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये या दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं आहे. त्यामध्ये अक्षरला, “तुझी आदेश बांदेकर यांच्याबरोबर जुनी ओळख आहे. काय ओळख आहे याबाबत सांग” असं विचारण्यात आलं होतं.
आदेश बांदेकर यांच्याबद्दल अक्षर म्हणाला, “खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर एकांकिका स्पर्धेत काम केलं होतं. त्याचं बक्षीस मला आदेशसरांच्या हातून मिळालेलं आणि काय योगायोग आहे की, आज मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. कारण- त्यावेळी असं होतं की, आम्ही कॉलेजमध्ये असताना स्पर्धेत भाग घेतला होता आणि आमच्या टीमला बक्षीस मिळालं नव्हतं; पण मला अभिनयासाठी आदेशसरांकडून बक्षीस मिळालेलं.”
अक्षर कोठारीला आदेश बांदेकरांनी दिलेला सल्ला
अक्षर पुढे म्हणाला, “त्यानंतर आमची टीम गेली होती त्यांच्याकडे की, आम्हाला का बक्षीस मिळालं नाही. तेव्हा त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं होतं. आम्ही सोलापूरचे आणि तिथल्या सेंटरवर ती स्पर्धा होती. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की, सोलापूरकरांना तुम्हाला अडचण काय असते की, तुम्ही बाहेर पडत नाही. त्याच्यासाठी तुम्ही डबक्याच्या बाहेर पडायला हवं. तुम्हाला डबक्यात पोहायची सवय लागली आहे. त्या वाक्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. त्यानंतर मी शिक्षणासाठी मुंबईला आलो. थिएटर आर्टसाठी अॅडमिशन घेतली आणि माझं करिअर सुरू झालं; पण हे वाक्य मी अजूनही विसरलेलो नाहीये. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद सर! तुम्ही त्यावेळी ते बोललात. त्यामुळे माझा हा प्रवास सुरू झाला आणि मी इथपर्यंत पोहोचलो. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.”
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अक्षरसारखी खूप हुशार मुलं आहेत; पण ती तिथेच स्थानिक पातळीवर काम करीत असतात. त्यामुळे ते जर मुंबईसारख्या ठिकाणी आले, तर त्यांना खूप चांगली संधी मिळू शकते.”