छोटा पडदा हे प्रेक्षकांच्या आवडीचं आणि सोयीचं माध्यम आहे. या माध्यमातून त्यांना घरबसल्या अनेक विषयांवर आधारित कथा, गोष्टी पाहायला मिळतात. तर मालिका आणि त्यामधील पात्रं या सर्वांशी प्रेक्षक अनेकदा जोडले गेलेले असतात. त्यामुळे मालिका किंवा त्यात दाखवले जाणारे प्रसंग हे नकळत प्रेक्षकांना प्रभावीत करीत असतात. मराठी मालिकाविश्वात वर्षानुवर्षं चालणाऱ्या अनेक मालिका आहेत. ‘वादळवाट’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘का रे दुरावा’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यांसारख्या अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलं.

त्यामुळे मालिका कायमच प्रेक्षकांचं विशेषत: स्त्रियांचं मनोरंजनाचं आवडतं माध्यम राहिलं आहे. आज काळ जरी खूप पुढे गेला असला तरी मालिकांची प्रसिद्धी काही कमी झालेली नाही. परंतु, अनेकदा असं चित्र पाहायला मिळतं की, मालिका म्हटलं की, फक्त किचन ड्रामा किंवा घरातील भांडणं एवढंच दाखवलं जात असल्याच्या तक्रारी प्रेक्षकही करीत असतात. तर यावर काही वेळेला कलाकारही त्यांचं मत मांडताना दिसतात. अशातच छोट्या पडद्यावरील ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री लीना भागवत यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे.

लीना भागवत यांनी ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना ‘तुम्हाला असं वाटतं का की, मालिकांचा समाजावर परिणाम होतो’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी “मला समाज सुधारण्यासाठी मालिका करायच्या नाहीत. मी माझ्यासाठी मालिका करते. पण मला जे म्हणायचं आहे, कुठल्याही गोष्टीबद्दल तर त्याच्यासाठी नाटक आहे. ज्यामधून मी ते करते, मी बोलते आणि मी लेखकाकडे यासाठी आग्रही असते. आणि ती विशिष्ट गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पण, मालिका हे त्याचं साधनच नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लीना भागवत यांनी शेवटचं ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत काम केलं होतं. तर सध्या त्या ‘आमने सामने’ या नाटकात पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये त्यांच्यासह त्यांचे पती व अभिनेते मंगेश कदमही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.