अभिनेत्री माधवी जुवेकर सध्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असली तरीही माधवी जुवेकर बेस्ट कर्मचारीदेखील आहे.
आता अभिनेत्रीने २०१७ साली घडलेल्या एका घटनेबाबत वक्तव्य केले आहे. २०१७ साली माधवी जुवेकरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. बेस्ट डेपोच्या पार्टीतील तो व्हिडीओ होता. यावेळी माधवी व तिचे सह कर्मचारी हे डान्स करत होते. मात्र, या पार्टीत अभिनेत्री पैसे तोंडात धरून डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. तर काही कर्मचारी ते पैसे उधळत असल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडीओची मोठी चर्चा झाली होती. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली होती.
माधवी जुवेकर काय म्हणाली?
त्यानंतर अभिनेत्रीने सर्वच बेस्ट कर्मचारी हे फार साधे आहेत. त्या नोटा खोट्या होत्या, असे स्पष्ट केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने २०१७ साली नेमकं काय झालं होतं, यावर वक्तव्य केले आहे.
माधवी जुवेकरने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा ती घटना घडली तेव्हा दोन मंत्र्याचा स्वत:हून फोन आला होता. ते मला म्हणालेले की जे घडलं आहे ते खरं सांगा. त्यावर मी त्यांना सांगितलेलं की मीच कशाला, पण तुम्ही कोणालाही विचारू शकता की नेमकं काय घडलं आहे.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “मी खरंच खऱ्या पैशांवर नाचले नव्हते. बाकिच्यांचे जाऊ दे पण, मला नैतिकता नाही का? मी आयुष्यात कधी पैशांवर नाचू शकत नाही. तो आमचा नाटकाचा दसरा होता. मलासुद्धा पहिल्यांदा पाहिल्यानंतर खऱ्या नोटा वाटल्या होत्या. पण, चिल्ड्रन्स बँकच्या त्या नोटा होत्या.”
“मी तेव्हाही खरी होते, मी आताही खरी आहे. मला माझं टेन्शन आलं नाही, मला बाकिच्यांचं टेन्शन आलं. आम्ही १३ जण होतो. कोणी बाजूने गेलं तरी त्यांना कोणी ओळखू शकत नाही. मला भाजी विक्रेत्यांपासून ते ड्रायव्हर्स, कंडक्टर्सपर्यंत, प्रत्येक ठिकाणी ओळखलं जायचं. मला माहिती होतं की मी खरी आहे आणि मी परत येणारच. “
“मात्र, मीडियाने असं का केलं मला माहित नाही. आधी मला कमीत कमी विचारायला हवं होतं. त्यांनी जे थेट आरोप केले, ते चुकीचे होते, असं मला वाटतं.शहानिशा करायला पाहिजे होती. मला विचारायला पाहिजे होतं.मी उत्तर द्यायला तयार होते. आमच्या बंगल्याबाहेर मीडियाचे लोक उभे होते. मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत होते. पुढचे तीन माझ्याच बातम्या टीव्हीला दिसत होत्या.
दरम्यान, अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकु हसलं मालिकेतून अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.