Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : कोकणात गणपती आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व आहे. हे सण आपल्या कुटुंबीयांसह एकत्र साजरे करण्यासाठी मुंबईकर कोकणवासी गावची वाट धरतात. गणपतीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात असते की, दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते. सध्या संपूर्ण कोकणपट्ट्यात घराघरांत गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे.
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे मूळचे कोकणातील आहेत. त्यामुळे त्यांच्याही घरी सध्या गणपती बाप्पाची आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बने याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निखिलला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
निखिल बनेचं मूळ गाव कोकणातील चिपळूण येथे आहे. गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निखिलचे कुटुंबीय दरवर्षी सणासुदीला कोकणात जातात. यंदाही बाप्पाच्या आगमनाला दोन दिवस बाकी राहिलेले असताना त्याचे कुटुंबीय गावी निघाल्याचं पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “एका वर्षान सणाला चला जाऊया कोकणाला…चाकरमानी हा निघाला गौरी-गणपती सणाला” हे कोकणातील पारंपरिक गाणं त्याने या व्हिडीओला लावलं आहे.
निखिल बनेने या व्हिडीओला, “चाकरमानी निघाले आतुरता…” असं कॅप्शन दिलं आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “आता चाकरमानी नाही कोकणवासी”, “कोकणवासी निघाले”, “भांडुप ते चिपळूण प्रवास सुखाचा होवो…गणपती बाप्पा मोरया”, “आम्ही कोकणकर अभिमान” अशा प्रतिक्रिया युजर्सनी निखिलच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
निखिलच्या सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना कायम कोकणातील संस्कृती, गणपतीचा सण तसेच शिमगोत्सवाची झलक पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने कोकणातील भातलावणीचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला होता. यावेळी नेटकऱ्यांनी, “कायम अशीच संस्कृती जपत राहा” अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये देत अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं होतं.