Maharashtrachi Hasya Jatra Fame Nimish Kulkarni Engagement Photo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. विनोदाचं अचूक टायमिंग साधत या कलाकारांनी गेली कित्येक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या शोमध्ये झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्याने चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिश कुलकर्णीने वैयक्तिक आयुष्यात नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. नुकताच, अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला असून, आता निमिश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी आहे तरी कोण?

निमिश कुलकर्णीची होणारी पत्नी सुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून ती काम पाहते. तिचं नाव आहे कोमल भास्कर. साखरपुड्याचे फोटो शेअर करत कोमल लिहिते, “एक नवीन सुरुवात…आता आयुष्यभर आम्ही एकत्र असू..” याशिवाय कॅप्शनमध्ये तिने साखरपुड्याची तारीख देखील नमूद केली आहे. निमिश व कोमल यांचा साखरपुडा २५ जुलै २०२५ रोजी पार पडला.

निमिश कुलकर्णीने साखरपुड्यात पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी घातली होती. तर, त्याच्या भावी पत्नीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी साखरपुड्यात नेसली होती. दोघांनी हातातील एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत सुंदर फोटोशूट केलं आहे.

निमिशने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. निखिल बने लिहितो, “अभिनंदन निमू आणि कोमू बाकी भेटलो की बोलूच आपण…” यासह समीर चौघुले, गौरव मोरे, सौरभ चौघुले, आशुतोष गोखले, वनिता खरात, अक्षया नाईक, वैभव चव्हाण, निरंजन कुलकर्णी, स्पृहा जोशी यांनी देखील कमेंट्स करत निमिश व कोमलला शुभेच्छा दिल्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निमिशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्याने हास्यजत्रेसह अनेक मालिका व प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे. अभिनेता सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अग्नी’ या बॉलीवूड सिनेमात सुद्धा झळकला आहे. या सिनेमात त्याने अग्निशामक दलातील निपुण धर्माधिकारी ही भूमिका आहे.