Maharashtrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap & Nikhil Bane : सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय गायक संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी संजूचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सुद्धा तुफान व्हायरल झालं होतं. यानंतर त्याने लॉन्च केलेल्या ‘काली बिंदी’ गाण्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता संजूने सगळ्या नेटकऱ्यांना ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरायला लावला आहे.

सध्या इन्स्टाग्रामवरील रील्स व्हिडीओ स्क्रोल केल्यावर प्रत्येकजण ‘शेकी’ गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…” म्हणत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या हूकस्टेप्स सुद्धा सर्वत्र लोकप्रिय झाल्या आहेत. यावरूनच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप आणि निखिल बने यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये रस्त्याने फेरफटका मारताना पृथ्वीक प्रताप निखिलला म्हणतो, “भावा गाडी आणायला पाहिजे होती यार…” यानंतर निखिल त्याला सांगतो, “अरे कशाला गाडी… चल इथून जाऊया जवळ पडेल…” दोघेही त्या दिशेला वळणार इतक्यात ‘एक नंबर, तुझी कंबर’ हे गाणं वाजतं.

संजूचं ट्रेंडिंग गाणं ऐकू येताच पृथ्वीक आणि निखिल दोघंही हूकस्टेप करून ‘शेकी’ गाण्यावर डान्स करू लागतात. यानंतर अचानक दोघंही भानावर येतात आणि थांबतात. निखिल पृथ्वीकला विचारतो, “हे काय करतोय?” यावर पृथ्वीक म्हणतो, “अरे ते इन्स्टाग्राम…” पुढे दोघंही आपआपल्या वाटेने निघून जातात. एकंदर हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, या गाण्याच्या साध्या दोन ओळी जरी ऐकल्या तरी, लोक हुबेहूब हुकस्टेप्स करत आहेत असं पृथ्वीक अन् निखिलला त्यांच्या व्हिडीओमधून सूचित करायचं आहे.

पृथ्वीक प्रतापने “इन्स्टाग्रामचा नाद लय बेक्कार…” असं कॅप्शन देत हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यावर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वाह वाह Moment है भाई”, “इथून-तिथून एक नंबर गाणं वाजतंय”, “भाई मस्त व्हिडीओ बनवलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पृथ्वीक प्रताप व निखिल बने या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यांचे मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर कायम चर्चेत येतात. हास्यजत्रेसह पृथ्वीकने अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.