Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. निखिल बने, शिवाली परब, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासह अभिनेता पृथ्वीक प्रतापला सुद्धा या शोमुळे एक नवीन ओळख मिळाली. आजवर पृथ्वीक प्रताप नाटक, विविध वेबसीरिज आणि असंख्य सिनेमांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष करून अभिनेत्याने त्याचा सिनेविश्वातील प्रवास सुरू केला होता. अल्पावधीतच पृथ्वीकला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे आता यशाच्या शिखरावर असताना पृथ्वीकचे अनेक चाहते त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. पृथ्वीक सुद्धा मोठ्या प्रेमाने सर्व चाहत्यांची भेट घेतो, त्यांच्यासह गप्पा मारतो आणि त्याचा हाच साधेपणा नेहमीच सर्वांची मनं जिंकून घेतो.

पृथ्वीकला भेटण्यासाठी आणि त्याच्या हास्यजत्रेतील कामाचं कौतुक करण्यासाठी नुकत्याच एक आजीबाई त्याला भेटायला आल्या होत्या. यावेळी सर्वप्रथम पृथ्वीकने पाया पडून आजींचे आशीर्वाद घेतले. आजी सुद्धा अगदी प्रेमाने सगळ्या गोष्टी पृथ्वीकला समजावून सांगत होत्या.

अभिनेता लिहितो, “आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहून मनापासून दाद देणाऱ्या… मनाने आणि आवाजाने सर्वात तरुण प्रेक्षक आजी भेटल्या. या आजींनी तोंडभरून कौतुक केलं. इतकं कौतुक करताना जराही न थकणाऱ्या आजींचा आवाज हा अगदी खणखणीत आणि आजच्या तरुण पिढीलाही लाजवणारा होता.”

पृथ्वीकच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हाच कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे”, “अजून काय हवं भाई”, “जिंकलास भावा”, “हीच कामाची पोचपावती”, “पृथ्वीक तुझा खूप अभिमान वाटतोय…हेच कमवायचं असतं”, “आजींचा आशीर्वाद मिळाला असंच काम यापुढेही करत राहा” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. याशिवाय पृथ्वीकचा हा व्हिडीओ सुद्धा सर्वत्र व्हायरल होत आहे.