Gaurav More & Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता ओंकार भोजनेने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे, गौरव मोरे या सगळ्याच कलाकारांना शोचे चाहते कायम मिस करतात.

आता अभिनेता गौरव मोरे लवकरच ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात झळकणार आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ओंकार भोजनेबरोबर असलेल्या मैत्रीविषयी भाष्य केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये जाण्यापूर्वी ओंकारकडून काही टिप्स घेतल्या आहेस का? असा प्रश्न गौरवला विचारण्यात आला.

ओंकार भोजनेने हास्यजत्रा सोडली अन्…

ओंकारबद्दल गौरव मोरे म्हणाला, “ओंकार अजूनही माझ्या संपर्कात आहे. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा वगैरे आम्ही एकमेकांना फोन करत असतो. आमचं खूप चांगलं बॉण्डिंग आहे… आम्ही दोघांनी एकत्र खूप काम केलंय. तो हास्यजत्रेतून गेला मग मी एकटा पडलो. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि उत्तम अभिनेता सुद्धा आहे. त्याचेही काही निर्णय होते…मी सुद्धा पाच वर्षांनी हा शो सोडला. आता तो सिनेमे करतोय, नाटकात काम करतोय. आम्ही मध्ये-मध्ये भेटतो…आता मध्यंतरी ‘झी’च्या इव्हेंटला सुद्धा भेटलो होतो. आपला मित्र भेटल्यावर नेहमीच बरं वाटतं.”

याशिवाय गौरव मोरे हास्यजत्रेत पुन्हा परण्याविषयी म्हणाला, “आता कठीण आहे जरा कारण, आता मी इथे ( चला हवा येऊ द्या ) काम करतोय त्यामुळे कठीण आहे. माझी ओळख, माझं नाव सगळं हास्यजत्रेमुळे झालं. हास्यजत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही. ते कायम माझ्याबरोबर राहणार…पण, काय असतं आपलं काम आहे… थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातोच म्हणून मी इकडे आलो. आता मला पाहिल्यावर फिल्टरपाड्याचा बच्चन असं म्हणतात ही ओळख सुद्धा कधीच पुसली जाणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरव मोरे आता ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात झळकणार आहे. २६ जुलैपासून हा शो सुरू होणार आहे. शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.