छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद प्रेक्षकांना खूप आवडतात. नुकतचं एका मुलाखतीत रसिकाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगितली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळेस त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातीलही अनेक घडामोडींचे किस्से सांगितले आहे. यावेळी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरनेही महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सुरुवातीच्या दिवसातील स्ट्रगलिंगच्या काळातील एक अनुभव सांगितला आहे.
हेही वाचा- …म्हणून वनिता खरातने किर्ती कॉलेजला घेतलेला प्रवेश, समीर चौघुलेंनी केली पोलखोल
रसिका म्हणाली, ” मी आधी काही मालिका आणि एकांकिका केल्या होत्या. त्यामुळे मला अभिनयाची जाण होती. पण मला जेव्हा कॉमेडी शोसाठी विचारलं तेव्हा मला माहिती नव्हतं की ते मला कसं आणि कितपत जमणार आहे. मी विनोदी नाटकांमधून काम करत होते. त्यात मला मज्जा येत होती. मला वाटल की स्किट या फॉरमॅटमध्येही आपण काम केलं पाहिजे म्हणून मी हो म्हणाले.”
रसिका पुढे म्हणाली, “पण जेव्हा हा प्रवास सुरु झाला तेव्हा मला कळालं ही हे अजिबात सोप्प नाहीये. नाटक किंवा मालिका करताना तुमच्याकडे रिटेक असतात. नाटक करताना तुमच्याकडे वेळही असतो. पण स्किट करताना तुमच्याकडे पाचपाणी स्क्रिप्ट असतं तुम्हाला पाठांतर करायचं असतं. सुरुवातीला माझी झोप उडायची. मी सकाळी साडेपाचला उठून सराव करायची. माझा नवरा घाबरुन यायचा आणि म्हणायचा काय करतेस आरडाओरडा का करत आहेस. मी सकाळी साडेपाच वाजता रडण्याचा सराव करत असायचे. आज काय स्क्रिप्ट असणार आहे किंवा आज काय भूमिका वाटयाला येणार आहे याचा विचार करुनच माझ्या पोटात गोळा यायचा. “